धाराशिव: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडून यावर वेगवेगळे खुलासे होत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाकडून मात्र संयमाची भूमिका घेतली जात आहे.
अशातच अहिल्यानगरचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी धाराशिव येथे बोलताना मोठा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणामुळे अजित पवार राष्ट्रवादीमधीलच कुणीतरी राजकीयदृष्ट्या ‘अनसिक्युअर’ होणार होतं, त्यामुळेच अडथळे निर्माण झाले, असा दावा त्यांनी केला. मात्र त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही.
नीलेश लंके म्हणाले,“पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढलो. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार तुतारी किंवा घड्याळ अशी चिन्हे देण्यात आली होती. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मी स्वतः, सुनील टिंगरे, रोहित पवार, सुनील शेळके आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांसोबत एकत्र प्रचार केला होता.”
जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्या पसंतीनुसार चिन्ह वाटप करण्यात आल्याचं लंके यांनी सांगितलं. “सातारा, खेड, शिरूर अशा भागांमध्ये घड्याळ चिन्हावर अनेक उमेदवार उभे होते. शिरूरमध्ये विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उभे असलेले अशोकबापू पवार यांच्या पत्नी आता घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ वरिष्ठ पातळीवर अनेक गोष्टी आधीच ठरल्या होत्या,” असा दावा त्यांनी केला.
विलीनीकरण प्रक्रियेत मुख्य भूमिका अजित पवारच बजावत होते, असं सांगत लंके म्हणाले,“आज दादा आपल्यात नसल्यामुळे काही लोकांकडून ‘अशा चर्चा झाल्याच नाहीत’, ‘दादा बोलले नव्हते’ असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हे प्रश्न अजित पवार राष्ट्रवादीतीलच नेत्यांकडून उपस्थित होत असतील, तर त्यामागे काहींचा स्वार्थ दिसतो.”
राजकारणात असुरक्षितता असतेच, असं स्पष्ट करत नीलेश लंके म्हणाले,“प्रत्येकाचं राजकीय गणित वेगळं असतं. पक्षाचंही असतं. काही नेते स्वतःच्या राजकीय सुरक्षिततेसाठी वेगवेगळे डावपेच आखत असतात.”नीलेश लंके यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आलं आहे.