बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आज बारामतीतील सहयोग निवासस्थानी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. या प्रसंगी पवार कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. कुटुंबातील हा हळवा क्षण उपस्थित प्रत्येकाला भावुक करून गेला.
सहयोग सोसायटीतील निवासस्थानी अजित पवार यांचा पुष्पहार अर्पण केलेला भव्य फोटो लावण्यात आला होता. शरद पवार यांनी त्या फोटोसमोर पुष्प अर्पण करत दादांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी हात जोडून अजितदादांचे दर्शन घेतले आणि तो क्षण पाहताच संपूर्ण वातावरण भावनांनी भरून गेले.
श्रद्धांजलीच्या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. अजित पवार यांच्या भगिनी, वहिनी तसेच पवार कुटुंबातील इतर सदस्यही हुंदक्यांनी दाटले होते. उपस्थित प्रत्येकाच्या मनात वेदना आणि हळवेपणाची भावना दिसून येत होती.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू असतानाच शरद पवार यांनी बुधवारी सायंकाळी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीसाठी शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, राजेंद्र पवार आणि आमदार रोहित पवार हेही उपस्थित होते.
राजकारणाच्या गदारोळात हरवलेला मानवी भावनिक क्षण आज बारामतीत पाहायला मिळाला. पवार कुटुंबातील या दुःखद पण एकत्रित क्षणांनी उपस्थित सगळ्यांनाच अंतर्मुख केलं.