कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांचा विचार महत्त्वाचा, एनडीएसोबत ठाम आहोत; सुनील तटकरे

Share

मुंबई:“कोण काय म्हणतंय यापेक्षा दादांनी दिलेला पक्ष आणि दादांनी दिलेला विचार घेऊन पुढे जाणे हेच आमचे ध्येय आहे. एनडीएसोबत आहोत आणि कायम सोबत राहणार आहोत,” अशा ठाम शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या अस्थी कलश पूजनासाठी आले असता तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. “मी दादांच्या परवानगीशिवाय कधीही कोणताही निर्णय घेतलेला नाही. एनडीएसोबत जाण्याचा निर्णय हा दादांनी विचारपूर्वक घेतलेला होता आणि त्या निर्णयाशी आम्ही पूर्णपणे ठाम आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया या प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचे सांगत, “महाराष्ट्र सावरण्यासाठी आणि अजितदादांचे ‘विकसित महाराष्ट्र’चे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. त्यात गैर काहीच नाही,” असा टोलाही तटकरे यांनी लगावला.

पक्ष विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांवर नाराजी व्यक्त करत तटकरे म्हणाले, “अंत्यसंस्कार होण्याआधीच विलीनीकरणाची चर्चा का सुरू करण्यात आली, हा प्रश्न माध्यमांनी विचारायला हवा. आम्ही कधीही विलीनीकरणाचा विषय काढलेला नाही, उलट आम्ही त्याच्या विरोधात असल्याचे चित्र पसरवले जात आहे.”

“शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेशी ठाम राहत, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला. महाराष्ट्रातील जनतेने या निर्णयाला कौल दिला आहे,” असे सांगत त्यांनी भाजप नेतृत्वाकडून मित्र पक्षाला मिळणाऱ्या सन्मानाचीही प्रशंसा केली.

यावेळी पक्ष कार्यालयात दिवंगत अजितदादा पवार यांचा अस्थी कलश विधीपूर्वक पूजन करण्यात आले. आजपासून राज्यातील सर्व जिल्ह्यांत अस्थी कलश दर्शनासाठी नेण्यात येणार असून, त्यानंतर त्या-त्या जिल्ह्यात नदीत विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.

या भावनिक प्रसंगी युवा नेते पार्थ पवार यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्या खुर्चीला मिठी मारली. यावेळी त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, हुंदके आवरता आले नाहीत. अस्थी कलश नेताना अनेक पदाधिकाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.

यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सना मलिक शेख, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांच्यासह पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *