दु:खातून सावरायच्या आधीच सत्तेच्या काटेरी सिंहासनावर बसावं लागल! किरण माने यांची भावनिक पोस्ट चर्चेत

Share

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अवघ्या तीन दिवसांत, ३१ जानेवारी रोजी त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी राज्याच्या ११ व्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच, मराठी अभिनेते किरण माने यांनी केलेली एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून महाराष्ट्रातील राजकारणावर तीव्र भाष्य करताना, हा खेळ “क्रूर, हिंस्त्र आणि निर्दयी” असल्याचे म्हटले आहे. बहुजन समाजाने ही नीच विचारसरणी ओळखून डोळे उघडेपर्यंत आणखी अनेक रक्तरंजित घटनांचे साक्षीदार व्हावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

या टीकेसोबतच किरण माने यांनी सुनेत्रा पवार यांच्याबद्दलचा वैयक्तिक अनुभवही मांडला आहे. सुनेत्रा पवार या अतिशय संवेदनशील, मायाळू आणि पर्यावरणप्रेमी व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. तीन वर्षांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी स्वतः फोन करून बारामतीतील त्यांच्या एन्व्हायरमेंटल फोरमच्या वर्धापनदिन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण दिले होते, अशी आठवण त्यांनी शेअर केली.

त्या कार्यक्रमातून सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणविषयक जनजागृतीसाठी केलेले मोठे कार्य पाहायला मिळाले, असे किरण माने यांनी नमूद केले. निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडे, हवामान बदल, प्रदूषण यावर त्यांचा सखोल अभ्यास असून लहान मुलांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या मुलांना पारंपरिक खेळांकडे वळवण्यासाठी लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू यांसारख्या खेळांच्या स्पर्धा भरवण्याचे कार्यही त्या करतात, असेही त्यांनी नमूद केले.

पतीच्या निधनाच्या दुःखातून त्या सावरलेल्या नसतानाच, त्यांना राजकारणाच्या कठोर मैदानात उतरावे लागले, याकडेही किरण माने यांनी लक्ष वेधले. ‘पहिली महिला उपमुख्यमंत्री’ या बिरुदांपेक्षा, पतीची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काटेरी सिंहासन स्वीकारणाऱ्या खंबीर भगिनी म्हणून सुनेत्रा पवार यांचा अभिमान असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आणि त्यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, राज्य सरकारने खातेवाटप जाहीर केले असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास ही तीन महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. तर अजित पवारांकडे असलेले नियोजन व वित्त खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *