बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदाची जबाबदारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाणार असून, त्या आजच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. या राजकीय घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते रोहित पवार यांची एक भावनिक सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर बारामतीतील कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या या पोस्टमध्ये अजित पवार यांच्यावरील प्रेम आणि जिव्हाळा व्यक्त करत एक महत्त्वाची विनंती केली आहे. अजित पवार यांच्या बॅनरवर किंवा फलकांवर ‘स्वर्गीय’ असा उल्लेख करू नये, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, “बारामतीचं दुसरं नाव म्हणजे आदरणीय साहेब आणि मा. अजितदादा. आजपर्यंत या दोघांपैकी ज्याला सत्तेचं पद मिळायचं, त्याच्या अभिनंदनाचे मोठमोठे बॅनर बारामतीत झळकायचे. त्यावर ठसठशीत अक्षरांत उपमुख्यमंत्रीपदी निवड किंवा भावी मुख्यमंत्री असे उल्लेख असायचे आणि तो राजबिंडा फोटो पाहून अभिमान वाटायचा. पण आज परिस्थिती वेगळी आहे.”
ते पुढे लिहितात, “डोंगराएवढ्या दुःखापुढे आज ना पदाचं कौतुक आहे, ना आनंदाचा जल्लोष. गळ्यात हार घातलेला अजितदादांचा फोटो पाहणं डोळ्यांना सहन होत नाही. आज अभिनंदनाच्या जागी श्रद्धांजलीचे बॅनर लागले आहेत. मात्र, मा. अजितदादांवर मनापासून प्रेम करणाऱ्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, अजितदादा आपल्यातच होते, आपल्यातच आहेत आणि त्यांच्या कामातून कायम आपल्यातच राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ शब्द लावण्याचं धाडस माझ्यात नाही, तसं आपणही करू नये.”
रोहित पवारांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यावर सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांचे नेतृत्व, कार्य आणि बारामतीशी असलेले नाते कधीही संपणार नाही, अशी भावना या पोस्टमधून स्पष्टपणे व्यक्त होत आहे.