पश्चिम बंगालमध्ये सत्ता कुणाची येणार! सी-व्होटर सर्वेक्षणात भाजप आघाडीवर 

Share

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका वेगाने जवळ येत असून मार्च–एप्रिल दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग फेब्रुवारीच्या अखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, सी-व्होटरच्या ताज्या सर्वेक्षणातून राज्यातील राजकीय वातावरणाचा अंदाज समोर आला आहे. सर्वेक्षणात मतदारांना प्रश्न विचारण्यात आला की, “जर आज पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुका झाल्या तर तुम्ही कोणाला मतदान कराल?”लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांच्या भावना वेगळ्या असल्या तरी, अशा सर्वेक्षणांतून सध्याचा जनतेचा मूड स्पष्टपणे समजतो. अनेकदा लोकसभा निवडणुकांचे ट्रेंड विधानसभा निवडणुकांवर परिणाम करताना दिसतात.

तृणमूल काँग्रेस अजूनही मजबूत

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २९ जागा जिंकत दमदार कामगिरी केली होती. सी-व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, आज निवडणुका झाल्यास तृणमूल काँग्रेस ही कामगिरी जवळपास कायम ठेवू शकते. मात्र पक्षाला एक जागा गमवावी लागू शकते आणि जागांची संख्या २९ वरून २८ वर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भाजपच्या ताकदीत वाढ

दुसरीकडे, भाजपला या सर्वेक्षणात थोडा फायदा होत असल्याचे चित्र आहे. भाजपच्या जागा १२ वरून १४ पर्यंत वाढू शकतात. ऑगस्टमध्ये झालेल्या MOTN सर्वेक्षणात भाजपला केवळ ११ जागांचा अंदाज देण्यात आला होता. म्हणजेच गेल्या काही महिन्यांत भाजपने काही प्रमाणात गमावलेली जमीन परत मिळवली आहे.मतांच्या टक्केवारीतही भाजपची वाढ दिसून येते. ऑगस्टमध्ये भाजपचा मतवाटा ३९ टक्के होता, तो आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे—सुमारे ३ टक्क्यांची वाढ.

ममता बॅनर्जींचा जनतेवर अजूनही विश्वास

तरीही, या सर्वेक्षणावरून स्पष्ट होते की पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस हा सध्या सर्वात मजबूत पक्ष आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरील जनतेचा विश्वास कायम आहे. विधानसभा निवडणुकीस अजून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी शिल्लक असून, स्थानिक मुद्दे आणि प्रचाराची दिशा महत्त्वाची ठरणार आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस सत्ता कायम ठेवते की भाजप प्रथमच बंगालमध्ये सत्तेची चव चाखते, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *