अजित पवारांच्या निधनानंतर सत्ता समीकरण बदलण्याची चिन्ह; सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?

Share

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या जाण्याने उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्रीपदाची महत्त्वाची जबाबदारी रिक्त झाली असून, या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची धुरा हाती घ्यावी आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारावी, यासाठी राष्ट्रवादीतील काही नेते प्रयत्नशील असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

अजितदादा समर्थकांची उघड मागणी

दरम्यान, अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावं, अशी स्पष्ट मागणी अजितदादा समर्थकांकडून केली जात आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर बारामतीतील अजितदादा प्रेमींनी ही भावना व्यक्त केली. “सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री केल्यास ‘सुनेत्रा अजित पवार’ हे नाव उपमुख्यमंत्रीपदावर कायम राहील,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

यासोबतच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेवरही कार्यकर्त्यांकडून चर्चा सुरू आहे. आता संपूर्ण पवार कुटुंबाने एकत्र बसून पुढील नेतृत्वाबाबत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. अजित पवार यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, मात्र पक्ष आणि राज्याच्या हितासाठी योग्य नेतृत्व ठरवणं गरजेचं असल्याचं मत अनेकांनी मांडलं आहे.

अजित पवार यांचे अपघाती निधन

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाले. बारामती विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. विमान आकाशात असताना स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यानंतर विमानाचा ताबा सुटून ते विमानतळाच्या आधीच एका शेतात कोसळले. अपघातानंतर विमानात आणखी दोन ते तीन स्फोट झाले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह चार जणांचा मृत्यू झाला.

या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. 29 जानेवारी रोजी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय सन्मानाने अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देश-राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी कोण भरून काढणार, आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा काय असेल, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *