पुणे: पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक आता फेब्रुवारीत होणार आहे. महापौर आरक्षणाच्या सोडतीनंतर महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. सुरुवातीला ही निवडणूक जानेवारी अखेरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीची अधिकृत तारीख समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी पुणे महापौर पदाची निवडणूक होणार आहे. यासाठी महापालिकेने विभागीय आयुक्तांना महापौर निवड प्रक्रियेबाबत पत्र पाठवले होते. 26 जानेवारीनंतर दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी चर्चा होती. मात्र विभागीय आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर निवडणूक 6 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिका प्रशासनाकडून 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पहिली विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत महापौरांची निवड केली जाणार आहे. यंदा महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे.
भाजपकडून कोणाला संधी?
महापौरपदासाठी भाजपकडून कोणत्या उमेदवाराला संधी दिली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, विरोधी पक्ष नेत्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला संधी देण्याची चर्चा आहे. तर उपमहापौर पदासाठी गणेश बीडकर, धीरज घाटे आणि श्रीनाथ भिमाले ही नावे चर्चेत असल्याची माहिती आहे.आता 6 फेब्रुवारीला होणाऱ्या विशेष सभेत पुण्याच्या नव्या महापौरांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.