छत्रपती संभाजीनगर: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदार यादीच्या पडताळणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जिल्हा निवडणूक विभागाने पूर्वीच्या ३२ लाख १६ हजार ९०७ पैकी २६ लाख ८ हजार ५०७ मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली असून, जिल्ह्यातील तब्बल ६ लाख ८ हजार ४०० मतदार वगळले आहेत. त्यात सर्वाधिक २ लाख ७० हजार मतदार पत्त्यावर आढळलेच नाहीत, तर ९४ हजार १६९ मतदार मृत आणि १ लाख ६३ हजार ६४५ मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित झाल्याचे माहिती पडताळणीत पुढे आली आहे, असे उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी सांगितले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने देशभरात ३० जूनपासून विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमध्येही या मोहिमेसाठी ३२६४ बीएलओ नियुक्त करून काम सुरू करण्यात आले होते. या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) घरोघरी जाऊन मतदार याद्यांची पडताळणी केले. मतदारांना गणनापत्राचे वाटप करणे व नंतर ते ॲपवर ऑनलाइन सादर करण्याचे काम बीएलओंना करावे लागले. यात अर्जाच्या वाटपाची प्रक्रिया वेगात झाली. तर डिजिटायझेशनचे प्रमाण धिम्या गतीनेझाले. त्यामुळे सतत कामाच्या गतीवरून ओरड सुरू राहिली. मात्र, यात कारवाई झाल्यानंतर कामाला गती आली.
या प्रक्रियेला प्रारंभी ३० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या कालावधीत बहुतेक प्रमाणात डिजिटायझेशन पूर्ण झाले नाही. त्यामुळे या कामाला ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा १७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. ही मुदत संपल्याने सोमवारी सर्व तालुक्यांचा अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार निवडणूक उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी सांगितले, की एसआयआरच्या प्रक्रियेत पत्त्यावर न आढळलेल्या मतदारांची संख्या २ लाख ७० हजार ९६० एवढी आहे. त्यात सर्वाधिक ७७ हजार ७१२ मतदार हे पूर्व मतदार संघातील तर त्या खालोखाल ६९ हजार ६०६ मतदार हे मध्य मतदार संघातील व ५९ हजार २०९ मतदार हे पश्चिम मतदार संघातील आहेत. तर ग्रामीण मतदार संघापैकी न आढळलेले मतदार सर्वाधिक २७ हजार ५९७ मतदार फुलंब्रीतील आहेत. दरम्यान, हे दावे, हरकती नोंदणी अधिकाऱ्यांकडे करता येणार आहेत.
जिल्ह्यातील ३२ लाख १६ हजार ९०७ मतदारांपैकी ६ लाख ८ हजार ४०० वगळून २६ लाख ८ हजार ५०७ मतदारांची प्रारुप प्रसिद्ध केली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीत जिल्ह्यातील ६ लाख ८ हजार ४०० मतदार वगळण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ३ लाख ९ हजार ९३ महिला मतदारांचासमावेश आहे. तर पुरुष मतदार २ लाख ९८ हजार ५०५ वगळले आहेत. त्यासोबतच ५९ इतर मतदारही वगळले आहेत. वगळलेल्या मतदारांपैकी जे मतदार जिल्ह्यात असूनही त्यांची नोंद झाली नाही. त्यांना पुन्हा नाव नोंदणीची संधी दिली जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सविता चौधर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादीत आपले नाव असल्याची तसेच नाव, पत्ता, वय, लिंग व अन्य तपशील अचूक असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास दावे व हरकती ३० सप्टेंबरपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. दावे व हरकतींसाठी विहित नमुनेमतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर मतदार यादीतील नोंदींच्या तपशिलात दुरुस्ती, बदल अथवा अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ मध्ये अर्ज करता येईल.