अजित पवार महाविकास आघाडीत येणार? संजय राऊतांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Share

मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनपेक्षित युती आणि आघाड्या पाहायला मिळाल्या. काही ठिकाणी भाजप–शिंदे गट एकत्र लढताना दिसले, तर तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूही एकत्र आल्याचं चित्र होतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट – शरद पवार आणि अजित पवार – पुणे, पिंपरीसह अनेक महापालिकांत एकत्र लढल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. शरद पवार महाविकास आघाडीतून बाहेर पडतील का, या प्रश्नावर थेट उत्तर न देता राऊत यांनी उलट सवाल केला. “शरद पवार बाहेर पडतील असं का गृहीत धरता? उलट अजित पवार शरद पवारांसह महाविकास आघाडीत येतील, असा विचार का करत नाही?” असं वक्तव्य त्यांनी केलं.

अजित पवारांना एक बाजू निवडावी लागेल

संजय राऊत म्हणाले की, शरद पवार हे महाविकास आघाडीसोबत ठामपणे आहेत. अजित पवार सध्या महायुतीत असले, तरी महाविकास आघाडीसोबत त्यांचा ‘पाट लावलेला’ आहे. “दोन दगडांवर पाय ठेवता येत नाही. अजित पवारांना भविष्यात एक बाजू निवडावीच लागेल,” असंही राऊत म्हणाले. त्यांच्या मते, भविष्यात संपूर्ण पवार कुटुंब महाविकास आघाडीत दिसू शकतं.

सिंचन घोटाळ्यावर भाजपला टोला

सिंचन घोटाळ्याच्या फाईलचा मुद्दा उपस्थित केल्यावर संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. “मेलं मेंढरू आगीला भीत नाही,” असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. “एकीकडे अजित पवारांना क्लीनचिट दिली आणि दुसरीकडे डरकाळ्या फोडत आहेत. त्या फाईलमध्ये काही आहे की फक्त पोकळ धमक्या?” असा सवाल त्यांनी केला.

छगन भुजबळ प्रकरणावरही भाष्य

छगन भुजबळ यांच्या प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले की, भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात होते आणि नंतर निर्दोष ठरले. त्यामुळे ईडी आणि गृहखात्याने प्रायश्चित घ्यायला हवं. “जोपर्यंत भाजपकडे सत्ता आहे, तोपर्यंत काही नेते भाजपसोबत असतील. सत्ता पालटली की ते मनाने, तनाने, धनाने आमच्यासोबत असतील,” असा टोला त्यांनी लगावला.

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

संजय राऊतांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अजित पवार खरंच भविष्यात महाविकास आघाडीत येणार का, की हे केवळ राजकीय दबावाचं तंत्र आहे, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *