‘डीजे’चे स्तोम संपलेले दिसेल; ‘कायद्याचा बडगा नको; लोकांना विश्वासात घ्यायला हवे’; मुख्यमंत्र्यांचा दावा…

Share

पुणे: ‘डीजे’च्या दणदणाटाने नागरिकांना भूकंप आल्यासारखा त्रास होत असून, अशा अनिष्ट प्रथांवर केवळ कायद्याचा बडगा न उगारता, लोकांना विश्वासात घेऊन आणि चर्चेतून मार्ग काढला पाहिजे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. या संदर्भात संपूर्ण राज्यासाठी लवकरच एक ठोस धोरण आखले जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी सर्व गणेशोत्सव मंडळांशी आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा केली आहे आणि त्यात बऱ्याच गोष्टींवर सकारात्मक एकमत झाले आहे, असे नमूद करून ते म्हणाले की, डीजेचे जे काही स्तोम तयार झालेले आहे, ते लोकांच्या सहभागातूनच कमी झालेले किंवा संपताना दिसेल.

ध्वनी प्रदूषणाबाबत घाईगडबडीत कोणतेही धोरण तयार न करता, विविध शहरांमधील चर्चेचे अनुभव घेऊन राज्य सरकार यावर ठोस धोरण आखण्याच्या पक्क्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एखादा सण जास्तीत जास्त पारंपरिक पद्धतीने आपल्याला साजरा करता आला, तर त्याचे महत्त्व अधिक असते, असे मत व्यक्त करून ते म्हणाले, वर्षानुवर्षे पडलेल्या पद्धती बंद करत असताना केवळ कायद्याच्या बडग्याने नव्हे तर लोकांना विश्वासात घेऊन त्यातून मार्ग काढणे हे अधिक महत्त्वाचे असते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यानंद बापट यांच्या मराठी भाषेच्या शुद्धतेचे तोंड भरून कौतुक केले. बापट यांची मराठी भाषा म्हणजे भाषेच्या शुद्धतेचा एक उत्तम नमुना असून, त्यांचे बोलणे ऐकून मनाला आनंद वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, त्यांनी कौतुक करतानाच एक मोलाचा सल्लाही दिला की, आपले परखड विचार मांडताना ते अधिक सर्वसमावेशक पद्धतीने मांडायला हवेत, जेणेकरून इतरांना किंवा इतर घटकांना त्याचा त्रास होणार नाही.

गुरुवारी गुंडांकडून हल्ला झाल्यानंतरही विद्यानंद बापट हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, समाजाने जर सती प्रथा आणि बालविवाहासारख्या अत्यंत जुन्या अनिष्ट चालीरिती कायद्याने बंद केल्या, तर मानवी आरोग्याला घातक ठरणारे ध्वनी प्रदूषण का बंद होऊ शकत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.

बापट यांच्या समर्थनार्थ आणि ‘डीजेमुक्ती’साठी येत्या रविवारी पुणे महापालिकेवर एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, ‘मी जिवंत असेन तर या मोर्चात स्वतः सहभागी होईन,’ असा निर्धार बापट यांनी व्यक्त केला

बापट यांनी १३५ वर्षांपूर्वीच्या पुण्याची तुलना आजच्या ‘आयटी हब’ पुण्याशी करताना म्हणाले की, आज ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्या आणि विविध शिफ्ट्समध्ये काम करणाऱ्या लाखो पुणेकरांना अरुंद रस्त्यांवरील आवाढव्य मंडप आणि ‘डीजे’च्या कर्णकर्कश आवाजाचा मोठा फटका बसतो.

पनवेलमध्ये डीजे, डॉल्बी आणि लेझर लाईटवर बंदी

पनवेल: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार पार पाडण्यासाठी पनवेल शहर पोलिसांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पाडली. या बैठकीत पोलिसांनी मंडळांना आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ‘डीजे’, ‘डॉल्बी’ आणि ‘लेझर लाइट्स’चा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!