मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि महापालिका निवडणुकांत महायुतीने वर्चस्व राखले असले, तरी भाजप पुन्हा एकदा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. अनेक ठिकाणी भाजपने स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या तुलनेत अधिक जागा जिंकत आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली आहे. याचा थेट परिणाम महायुतीतील घटक पक्षांवर, विशेषतः शिंदे गटावर होत असल्याचे चित्र आहे.
निवडणूक निकालांमध्ये शिंदेसेनेची कामगिरी अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे न झाल्याचे दिसून आले. काही नगर परिषदांमध्ये भाजपच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करण्यात शिंदे गटाला अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी थेट नगराध्यक्षपदाऐवजी उपनगराध्यक्ष किंवा उपमहापौर पदावर समाधान मानावे लागले.या निकालांमुळे महायुतीत भाजपचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये गेले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करणे, जिल्हा व तालुका पातळीवर पदाधिकारी बदलणे आणि शिंदेसेनेची स्वतंत्र ओळख ठळक करण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याचे संकेतही मिळत असून काही मंत्र्यांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रात शिंदे गट अपेक्षेप्रमाणे प्रभाव पाडू शकलेला नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील धरणगाव नगराध्यक्षपद गमावल्याने मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका होत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील यांनी, “ज्यांनी मंत्रिपद दिलं त्यांनी काढलं तरी फरक पडणार नाही. पक्षाने जिथे गरज वाटेल तिथे निर्णय घ्यावा,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदेसेनेत मंत्रिमंडळ फेरबदल होणार का, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.आगामी निवडणुकांच्या तोंडावर शिंदे गट कोणते ठोस निर्णय घेतो, याकडे आता राज्याचे राजकीय लक्ष लागले आहे.