पुणे : पुरंदर तहसीलदार कार्यालयातील अधिकृत दूरध्वनी सेवा बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषत: खेडेगावातून येणारे ज्येष्ठ नागरिक आणि कागदपत्रांसाठी माहिती घेणारे अर्जदार यांना सतत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तहसील कार्यालयाशी 02115-222331 या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु फोन बंद असल्यामुळे प्रतिसाद मिळत नाही. याशिवाय पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांच्याशीही अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र संपर्क होऊ शकला नाही.
ग्रामीण भागातील नागरिकांकडे नेहमी ऑनलाइन सुविधांचा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे दूरध्वनीद्वारे माहिती मिळवणे हा त्यांच्यासाठी एकमेव सोपा मार्ग असतो. परंतु फोन सेवा बंद असल्याने प्रमाणपत्रे, महसूल संबंधित कामे, जमीन नोंद, विविध अर्ज, माहिती पडताळणी इत्यादी कामांसाठी नागरिकांना तहसील कार्यालयापर्यंत प्रत्यक्ष जावे लागत असून वेळ व खर्च दोन्ही वाढत आहेत.
तहसील कार्यालयातील फोन सेवा तातडीने सुरू करावी आणि नागरिकांच्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.