मुंबई: प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्ष यांच्यात वैचारिक आघाडी झाली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांच्यासह चंद्रकांत बावकर, जे. टी. तांडेल, पांडुरंग मिरगळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही आघाडी केवळ सत्तेसाठी नसून सामाजिक न्यायाच्या व्यापक भूमिकेतून झाल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “धनगर, ओबीसी, मराठा आणि आदिवासी समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जातीय संघर्ष पेटवण्याचे काम केले आहे. २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले गेले होते, मात्र आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या समाजांचा भाजप आणि फडणवीस यांच्यावरचा विश्वास उडाला आहे.”
राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केल्यानंतर मोदी सरकारला त्याचा निर्णय घ्यावा लागला, मात्र अद्याप जातनिहाय जनगणना झालेली नाही, असा आरोपही सपकाळ यांनी केला. “ज्यांची जेवढी लोकसंख्या, तेवढी भागीदारी” हीच काँग्रेसची ठाम भूमिका असून, धनगर व ओबीसी समाजाला योग्य प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी बहुजन पक्षाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “ओबीसी आरक्षणाचे लचके तोडण्याचे काम सध्या सुरू असून २७ टक्के आरक्षणावरही घाला घातला जात आहे. जीआरवर जीआर काढले जात असले तरी कोणत्याच समाजाला प्रत्यक्ष फायदा होत नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठीच स्वतंत्र पक्षाची स्थापना करून समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
भिवंडी महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांचा सत्कार
भिवंडी महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाचे ३० नगरसेवक विजयी झाल्याबद्दल आज टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, भिवंडी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार रशीद ताहीर मोमीन, प्रभारी राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस नूर अन्सारी, जावेद फारुखी, रमाकांत भोई यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भिवंडी महानगरपालिकेतील यशाबद्दल नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करताना, आगामी काळात लोकहिताच्या प्रश्नांसाठी एकजुटीने व ताकदीने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केले.