अहिल्यानगर: अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी एकहाती सत्ता मिळवली असून, निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजय मिरवणुकीत एक वेगळाच राजकीय संदेश पाहायला मिळाला. या मिरवणुकीदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या गळ्यात भाजप पक्षाचा पंचा दिसून आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांच्या गळ्यात पक्षाचा नसून भगवा पंचा दिसल्याने सर्व राज्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले आहे.
आमदार संग्राम जगताप हे अजित पवार गटाचे आमदार असले तरी मागील काही काळापासून ते हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आमदार म्हणून पुढे येताना दिसत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीची लाट होतीच; मात्र आमदार जगताप यांची हिंदुत्ववादी भूमिका ही सत्ता मिळविण्यासाठी निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळात आमदार संग्राम जगताप आणि अहिल्यानगरकरांचे नाते अधिक घट्ट होईल, असा विश्वास सामाजिक व राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे भविष्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.