मुंबई: अटीतटीच्या झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला ११८ जागांसह बहुमत मिळाले असले तरी महापौरपदासाठी आता शहरात राजकारण वेगाने गरम झाले आहे.
निवडणुकीत भाजपाला ८९, तर शिंदेसेनेला २९ जागा मिळाल्या. यामुळे महापौरपदासाठी भाजपाला शिंदेसेनेच्या पाठिंब्याची गरज भासते. त्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी केली असून, मुंबईतील सत्तास्थापनेसाठी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
शिंदेसेनेने महापौरपदावरून आपली भूमिका स्पष्ट केली असून, भाजपाने मुंबईत सन्मानपूर्वक पदं सोडावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईत महापौरपदावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महापौरपदासाठी भावनिक विधान करत, “देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर बसेल,” असे सांगितले आहे. शिंदेसेनेने संभाव्य तणाव लक्षात घेऊन आपल्या विजयी झालेल्या २९ नगरसेवकांची हॉटेलमध्ये रवानगी केली आहे. मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीसाठी हे राजकीय खेळ पुढील काही दिवसांत अधिक तापतील, असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.