शिवसेनेचा धाडसी निर्णय! बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; केडीएमसी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वादळ

Share

कल्याण: राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDM) निवडणुकीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाच पॅनल क्रमांक १८ मध्ये बनावट पॅम्प्लेट प्रकरणामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.

महायुतीच्या अधिकृत पॅम्प्लेटमध्ये खोडसाळपणा करून बनावट पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा आरोप करण्यात आला असून, या गंभीर प्रकरणानंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख व परिवार सभापती मनोज चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.

बनावट पॅम्प्लेटमुळे प्रचारात गोंधळ

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पॅनल क्रमांक १८ मध्ये भाजपची एक जागा बिनविरोध निवडून आली असून उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये दोन शिवसेना आणि एक भाजपचा उमेदवार रिंगणात आहे.दरम्यान, नेतीवली परिसरात सोशल मीडियावर एक बनावट पॅम्प्लेट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं. या पॅम्प्लेटवर दोन धनुष्यबाण आणि एक कपाट अशी निवडणूक चिन्हे दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहल मोरे यांच्या नावासमोर कमळाऐवजी शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांचं कपाट चिन्ह छापण्यात आलं आहे. यावर “आमचं ठरलंय” असा मजकूर टाकण्यात आल्याने मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला.

महायुतीची पत्रकार परिषद; निवडणूक आयोगाकडे तक्रार

या प्रकारामुळे भाजप-शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं. यावर महायुतीच्या उमेदवारांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत तीव्र प्रतिक्रिया दिली.भाजपचे निवडणूक प्रमुख नरेंद्र सूर्यवंशी, शिवसेना उमेदवार मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आणि भाजप उमेदवार स्नेहल मोरे यांनी आरोप केला की, “पराभवाच्या भीतीपोटी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा खोडसाळपणा करण्यात आला आहे. महायुती मजबूत आहे आणि अशा प्रकारांना बळी पडणार नाही.”या प्रकरणी दोषींविरोधात निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मनोज चौधरी यांची शिवसेनेतून हकालपट्टी

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांनी पक्षविरोधी कारवाया व आदेशांचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून मनोज चौधरी यांची तात्काळ हकालपट्टी केल्याची अधिकृत घोषणा केली.

आरोप फेटाळले; निष्पक्ष चौकशीची मागणी

दरम्यान, मनोज चौधरी आणि अपक्ष उमेदवार प्रीती मनोज चौधरी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.“आम्ही किंवा आमच्या समर्थकांनी कोणतेही बनावट पॅम्प्लेट तयार केलेले नाहीत. आमच्या प्रचाराला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विरोधक अस्वस्थ झाले असून त्यामुळेच आमच्यावर खोटे आरोप केले जात आहेत,” असा दावा त्यांनी केला.या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांमार्फत व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

मतदानाच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले

एकूणच, मतदानाच्या अवघ्या काही तास आधी पॅनल १८ मध्ये घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता या प्रकरणात निवडणूक आयोग आणि पोलिसांची पुढील भूमिका काय असते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *