परभणी: धनभाऊ तुमची लायकी आहे का? तुमचा इंदौरमध्ये मर्डर झाला असता पण भय्यू महाराजांनी तुम्हाला वाचवले होते. तुम्ही कोणत्या हॉटेलवर होतात हेदेखील मला माहिती आहे, पण मी सगळेच आता काढणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केले. रत्नाकर गुट्टे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला गंगाखेड येथे आयोजित जाहीर सभेत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोपही केले. गुट्टे यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक दावा करताना म्हणाले, ‘धनंजय मुंडेंचा इंदोर येथील एका हॉटेलमध्ये मर्डर होणार होता. मात्र त्यांना भय्यूजी महाराजांनी वाचवले. धनंजय मुंडे कोणत्या हॉटेलमध्ये थांबले होते, याचीही माहिती आपल्याकडे आहे. मात्र आपण ती माहिती सार्वजनिक करणार नाही. पण तुमचा निकाल लावल्याशिवाय राहणार नाही.

Price : 350/-
WhatsApp : 93712 69949
तुम्ही सुरुवात केली आहे पण शेवट मी करणार आहे. तुम्ही मला 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केला, तुम्ही माझ्या विरोधात कोणाकोणाला उमेदवारी दिली, त्यांच्यासाठी किती ताकद लावली, हे देखील मला माहित आहे. पण माझी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील जनता हीच माझं बुलेटप्रूफ जॅकेट आहे, त्यामुळे माझा पराभव होऊ शकला नाही, मी प्रचंड मताधिक्याने विजयी झालो, असेही रत्नाकर गुट्टे म्हणाले.
धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वी गंगाखेडमध्ये सभा घेतली होती. या सभेत त्यांनी रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर १६०० कोटींचं कर्ज उचललं ते नीरव मोदी आहेत, अशा शब्दांत धनंजय मुंडेंनी टीका केली होती. याला उत्तर देताना गुट्टे यांनी धनंजय मुंडेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.