पुणे : जे लोक महिलांना कमीपणाची वागणूक देतात, महिलांचा द्वेष करतात. अशी मंडळी भरपूर लेखन करतात, मात्र वाचक म्हणून आपण सजग राहून अशा मंडळींचे लेखन वाचू नये, असा सणसणीत चपराक ज्येष्ठ गझलकार म.भा.चव्हाण यांनी दिला आहे.
वल्लरी प्रकाशनाद्वारे प्रकाशित ‘सुरंगी’ या अठराव्या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाच्या आणि अनघा सांगरुळकर लिखित ‘चांदणवेलीची फुलं’ या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभात चव्हाण बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यशदाचे प्रकल्प संशोधक व्यंकटेश कल्याणकर, ‘सुरंगी’च्या संपादिका प्रज्ञा कल्याणकर, कवयित्री डॉ. राजश्री पाटील, साहित्यिका मानसी चिटणीस, समर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष किरण इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. चव्हाण पुढे म्हणाले, ‘‘आपल्याकडे महिलांबद्दल खूप लिहिलं जातं. खूप महिला स्वत:ही आपली वेदना लिहितात. यातून परिवर्तन घडत आहे. महिलांनी लिहित रहावे. महिलांचे लेखन समकालीन वास्तव मांडणारे ऐतिहासिक दस्तावेज आहेत.’
इनामदार म्हणाले, ‘‘नव्याने लिहिणाऱ्या अधिकाधिक महिलांना संधी देणारा वल्लरी प्रकाशनाच्या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचा उपक्रम हा केवळ साहित्यिक उपक्रम न राहता तो आता महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभिसरणाच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा प्रकल्प बनला आहे.’’
‘सुरंगी’मध्ये हेमंत बर्वे, अनघा सांगरुळकर, ज्योती गन्धे, मानसी चिटणीस, पंडीत खेत्रे, प्रियंका मराठे, अंजली देशपांडे अशा सात कवी-कवयित्रींचा समावेश आहे. यावेळी ज्योती मनोहर आणि मंजुषा पागे यांनी ‘चांदणवेलीची फुलं’ या पुस्तकातील ललित लेखांचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कल्याणकर यांनी केले तर ज्योती इनामदार यांनी आभार मानले.