नाशिक : माजी आमदार निर्मला गावित यांना रविवारी (ता. २४) सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात गंभीर दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्यावर नाशिक येथील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपल्या नातवाला फिरवण्यासाठी बाहेर पडलेल्या निर्मला गावित यांना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघाताचा थरारक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
निर्मला गावित या आपल्या नातवाला फिरवत रस्त्याच्याकडेने जात होत्या. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना पाठीमागून जोरात धडक दिली. त्या रस्त्यावर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ धाव घेतली. प्राथमिक उपचार दिले आणि रुग्णवाहिकेद्वारे नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, निर्मला गावित यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, अपघाताचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वाहन चालकाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. संबंधित वाहन चालकाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाहन चालकाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर, शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2019 ला शिवसेनेत आले होते. आता नेतृत्व बदललं आहे. पक्ष शिवसेनाच आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन असू द्या. आजपासूनच मी कामाला लागणार आहे, असे निर्मला गावित पक्षप्रवेशावेळी म्हटले होते.

WhatsApp : 93712 69949