भंडारा: भाजपला आता निवडणूक लढविण्यासाठी माणसांची नाहीतर, पैशाची गरज असून, पक्षात मान राहिला नसल्याने राजकारणातली इमानदारी टिकून राहावी, यासाठी पुतण्याला पाठिंबा देऊन त्याच्या बंडखोरीला समर्थन करीत असल्याचा खळबळजनक आरोप मधुकर कुकडे यांनी भाजपवर केला आहे.
तुमसर येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. भाजपचे तीन वेळा आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदा खासदार राहिल्यानंतर भाजपमध्ये घरवापसी करणाऱ्या मधुकर कुकडे यांचा पुतण्या आशिष कुकडे यांना भाजपने शेवटच्या क्षणी डावलून प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिली. यामुळे भाजपमध्ये तुमसरात बंडखोरी झाली आहे. माजी खासदार असलेल्या मधुकर कुकडे यांच्या पुतण्यानं ही बंडखोरी केली असून त्याच्या पाठीशी स्वतः माजी खासदार राहणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू केली आहे.
मागील चार महिन्यांपासून नगरपालिकेची माझी तयारी चालू आहे. मी तीन वेळचा कुणबी समाजाचा आमदार आणि एकदा खासदार राहिलेला असतानाही माझ्या शब्दाला पक्षात मान राहिला नाही. त्यामुळं मी निर्णय घेतलाय की, एकदा निवडणूक लढायची. आशिषला तिकीट नं मिळणे म्हणजे माझी पक्षात किंमत शून्य आहे. माझी गावातील इमेज वाचविण्यासाठी आणि राजकारणात ईमानदारी करण्यासाठी आम्ही लढू.
आदरणीय फुके साहेब म्हणतात की, निवडणुकीला पैसे लागतात. मी म्हणालो, जेवढी प्राथमिक गरज आहे, तेवढा मी खर्च करायला तयार होतो. दारूवर मी पैसे खर्च करायला तयार नव्हतो. लोकांना 100 रुपये लागत असेल तर, मला 10 रुपये खर्च येतो, ही मी सांगितले. मी 15 वर्ष भाजपचा आमदार राहिलो. पण, कधीही पैसे पाहून तिकीट दिलं नाही. तर, जात बघून नाही तर, माणसं बघून तिकीट दिल्या जातं होतं, पुतण्या आशिषच्या बंडखोरीमुळे भाजपनं माझ्यावर शिस्तभंगची कारवाई करावी, मी घाबरतं नाही, असेही माजी खासदार मधुकर कुकडे यांनी म्हटले आहे.