छत्रपती संभाजीनगर: गंगापूर तालुक्यातील भालगाव येथील भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश रघुनाथ टेमकर (वय 30) यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. 14) दुपारी गंगापूर तालुक्यातील हदियाबाद-नारवाडी रस्त्यालगत, नारवाडी शिवारातील नळकांडी पुलाजवळ आढळला आहे. यामुळे संपूर्ण गंगापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
स्थानिक सरपंच आसिफ पटेल आणि समाजसेवक गौरव विधाटे यांनी मृतदेह आढळल्यानंतर गंगापूर पोलिसांना तत्काळ माहिती दिली. पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड, विजय पाखरे, अनिरुद्ध शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, गंगापूर येथे पाठवण्यात आला.
गणेश रघुनाथ टेमकर यांचा मृतदेह आढळला असला तरी, मृतदेहावर कोणत्याही मारहाण किंवा शस्त्राने केलेल्या हल्ल्याचे ठसे आढळले नाहीत. तसेच, कोणत्याही वाहनाने धडक दिल्याचेही स्पष्ट चिन्हे घटनास्थळी आढळली नाहीत. त्यामुळे, अपघातामुळे ही घटना घडली की घातपात झाला यावर संशय व्यक्त केला जात आहे. गणेश रघुनाथ टेमकर हे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांचा मृत्यूने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.