संगमनेर (नगर): समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक, पाहुण्यांच्या उपस्थितीने गच्च भरलेले कार्यालय, वारकरी वेशात टाळकरी, बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरला. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असल्यामुळे नेटिझन्सनी व्हिडिओ पाहून टीका सुरू केली आहे.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख हिचा साखरपुडा संगमनेरमध्ये साहिल चिलाप या बांधकाम व्यावसायिकासोबत पार पडला. सजावट, पोशाख आणि वातावरण यामुळे या साखरपुड्याला राजेशाही थाट लाभला. अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अनेकांनी “इंदुरीकर महाराजांच्या घरातला आनंदाचा सोहळा” असे म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी टीका केली आहे. महाराज नेहमी आपल्या किर्तनातून साधेपणाचं महत्त्व सांगतात, पण या वेळी त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या कुटुंबातील आनंदाचा क्षण पाहायला मिळाला. लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका केली आहे. दुसऱ्यांना अक्कल शिकवणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी पोरीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च केला, अशा शब्दात सुभाष तळेकर यांनी महाराजांवर निशाणा साधला आहे.
View this post on Instagram
मुलांची लग्न, साखरपुडे साध्या पद्धतीने करा. कर्ज काढू नका, असा आग्रह इंदुरीकर महाराज कीर्तनातून धरतात. लग्न सोहळ्यात वाढत चाललेल्या खर्चावरून त्यांनी अनेकदा सांगितले आहे. परंतु, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, या उक्तीप्रमाणे जर निवृत्ती महाराज इंदुरीकर वागले असते तर त्यांनी मुलीचा अतिशय साध्या पद्धतीने साखरपुडा करून समाजापुढे आदर्श निर्माण केला असता. कालच्या साखरपुड्यात एवढा खर्च झाला नसता. साखरपुड्यात जर लाखो रुपये खर्च होणार असतील तर लग्नात नक्कीच करोडो रुपये खर्च होतील, असे सुभाष तळेकर म्हणाले.
दरम्यान, साहिल चिलाप हे मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील असून, उच्च शिक्षित आहेत. गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे आणि शहरात त्यांनी स्वतःचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. इंदुरीकर महाराजांच्या या साखरपुड्याच्या कार्यक्रमामुळे पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर चाहत्यांचं लक्ष केंद्रित झाले आहे. राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, या साखरपुड्यात सत्कार, हार, तुरे आणि शाल-श्रीफळ न स्वीकारता संपूर्ण कार्यक्रम साधेपणाचं उदाहरण ठरला आहे.
View this post on Instagram