सातारा : साताऱ्यातील महिला डॉक्टराच्या आत्महत्येनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पीडितेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताहेत का? असा प्रश्न सध्या विरोधकांकडून विचारला जात आहे. चाकणकर यांनी ज्या प्रकारे या प्रकरणाचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. पीडित युवतीच्या वडिलांनी देखील रुपाली चाकणकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप वक्तव्य करत रूपाली चाकणकर यांची अजित पवारांकडे तक्रार केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला. या वेळी कुटुंबीयांनी महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी अजित पवारांनीही याबाबत मी त्यांना विचारणार असल्याचे सांगितले. तसेतच मुख्यमंत्र्यांशी देखील या प्रश्नावर चर्चा करण्याचे आश्वासन कुटुंबीयांना दिले आहे. अजित पवार म्हणाले, रूपाली चाकणकर यांच्या मताशी आम्ही सहमत नाहीत. या संदर्भात आम्ही रूपाली चाकणकर यांना विचारणा करणार आहे. त्यांच्या मताचे कोणीही आम्ही समर्थन करनार नाही. तसेच त्यांनी असं का केलं याचं कारण विचारणार आहे.
फलटणधील डॉक्टर युवतीने आत्महत्येपूर्वी आपल्या तळहातावर आत्महत्येचं कारण लिहून ठेवले होते. पीएसआय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा त्यात उल्लेख आहे. प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचं तरुणीच्या हातावरील मजकुरात आढळून आले आहे. पोलीस आणि राजकारण्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे डॉक्टर युवतीच्या लेखी तक्रारीतून समोर आले आहे. पण तिचा तो मुद्दाही चाकणकरांनी खोडून काढला. दुसरीकडे चाकणकरांच्या या पत्रकार परिषदेवरच सुषमा अंधारे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना यापूर्वीही टीकेचं धनी व्हावं लागलं आहे. वैष्णवी हगवणे, तनिषा भिसे प्रकरणातही विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला होता. आता फलटण प्रकरणातही त्या विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत.