मुंबई: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो मंगळवारी मुंबईत दाखल झाले. ‘सुपरइंटेलिजन्स’चा मानवजातीला फायदा व्हावा आणि इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त व खुला राहावा, यासह अनेक मुद्द्यांवर अमेरिका आणि भारताचे एकमत असल्याचे ते म्हणाले. मुंबईतील ‘फ्रीडम २५०’ सोहळ्यादरम्यान रुबियो बोलत होते. मुंबई आणि पश्चिम भारतातील जामनगरच्या दोन दिवसीय दौऱ्यात, रुबियो हे सरकारी आणि व्यावसायिक नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचाही समावेश आहे. त्यांची कंपनी जामनगरमध्ये जगातील सर्वांत मोठा क्रूड रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते.
दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध तणावपूर्ण असताना, रुबियो यांचा या वर्षातील हा दुसरा भारत दौरा आहे. यावेळी मार्को रुबियो दिल्लीला न येता थेट मुंबईला गेले. यावेळी त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतली.
अलिकडच्या दिवसांत, मार्को रुबियो आणि इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील एक व्यापक व्यापार कराराला जवळपास पूर्ण झाला आहे. यामुळे रुबियो यांच्या दौऱ्यादरम्यान व्यापार करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, रुबियो आणि जयशंकर यांनी ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य वाढवण्यावर विशेष चर्चा केली. वाढता ऊर्जा व्यापार नवी दिल्लीच्या पुरवठा साखळ्यांमध्ये विविधता आणण्यात परिवर्तनकारी भूमिका बजावू शकतो, यावर रुबियो यांनी जोर दिला. पाच महिन्यांत अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांचा हा दुसरा भारत दौरा आहे.
जयशंकर यांच्यासोबतच्या चर्चेपूर्वी, रुबियो यांनी हॉटेल ताजमहालला भेट दिली आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पुष्पचक्र अर्पण केले. या हल्ल्यात सहा अमेरिकी नागरिकांसह अनेक जण ठार झाले होते. मुंबईत डॉ. जयशंकर यांच्याबरोबर ऊर्जा सुरक्षा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा झाली. तसेच अमेरिका-भारत सामरिक भागीदारी पुढे नेण्याच्या महत्त्वावर पुन्हा एकदा भर देण्यात आला, असे रुबियो यांनी सांगितले.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि एस. जयशंकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यात परराष्ट्र मंत्र्यांनी एक विशेष संदेश दिला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान मार्को रुबियो आणि सर्जिओ गोर हे डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासोबत दिसले. त्यांच्या हातात शॅम्पेनचे ग्लास होते. विशेष म्हणजे, डॉ. जयशंकर आणि विक्रम मिस्री यांनी रुबियो आणि गोर यांच्यासोबत टोस्ट केला. त्यानंतर मार्को रुबियो यांनी शॅम्पेनचा एक घोट घेतला. मात्र, जयशंकर यांनी शॅम्पेनचा ग्लास ओठांपर्यंतही नेला नाही. त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांसोबत टोस्ट केला, पण मद्यपान न करून त्यांनी ‘मद्यपान करू नका’, असाच सर्वांना संदेश दिला आहे.