नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून परिसीमन विधेयक (डीलिमिटेशन बिल) संसदेत परत आणण्याबाबत चर्चा वाढत आहे. सरकारी सूत्रांच्या दाव्यानुसार, विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त खासदारांचा पाठिंबा सरकारने मिळवला आहे. तथापि, विधेयकाचे स्वरूप आणि संसदेत ते सादर करण्याच्या तारखेबाबतची अधिकृत भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. सरकार या विधेयकावर इतकी गुप्तता का पाळत आहे, असा प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेतील खासदार संदोश कुमार यांनी उपस्थित केला आणि सरकारने आपला अजेंडा सर्व पक्षांसमोर मांडला पाहिजे, अशी मागणी केली.
काँग्रेसने आपल्या खासदारांना पुढील काही दिवसांसाठी प्रवासाचे वेळापत्रक लवचिक ठेवण्यास आणि गरज पडल्यास दिल्लीला येण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसनेदेखील आपल्या खासदारांना कोणत्याही वेळी उपलब्ध राहण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्ष संभाव्य विधेयकातील तरतुदी आणि सरकारच्या रणनीतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
महिला आरक्षण आणि सीमांकन विधेयकावर सरकारचे म्हणणे आहे, की या विधेयकामुळे विधानसभा आणि लोकसभेत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल, तर विरोधी पक्षाचे म्हणणे आहे, की सरकारने विद्यमान ५४३ जागांवर महिला आरक्षण लागू करावे. परंतु सरकारचा हेतू लोकसभेच्या जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवण्याचा आहे, ज्यामुळे अनेक लहान राज्यांच्या हितावर परिणाम होईल.
मिळालेल्या माहितीनुसार, कागदोपत्री एनडीएला ३२१ खासदारांचा पाठिंबा आहे. टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) पक्षांतील २६ खासदारांनी पक्षांतर केल्यानंतर हा आकडा गाठता आला. ५४० सदस्यांच्या सभागृहात, सर्व खासदार उपस्थित राहून मतदान करत असताना, विधेयक मंजूर करण्यासाठी ३६० मतांची आवश्यकता आहे. याचा अर्थ सरकारला अद्याप ३९ मतांची आवश्यकता आहे. यापूर्वी वायएसआर काँग्रेसच्या चार खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षातून बाहेर पडल्यास आणखी आठ मतांची भर पडू शकते. सरकार द्रमुक पक्षालाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्याकडे लोकसभेत २२ खासदार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरच्चंद्र पवार) सुप्रिया सुळे यांनी सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात ५० टक्क्यांनी वाढवण्याच्या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, की जर सरकारने सर्व राज्यांमध्ये जागा समान प्रमाणात वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला, तर त्यांचा पक्ष त्याला पाठिंबा देण्यास तयार असू शकतो. मात्र, त्यांनी या मुद्द्यावर इंडी आघाडीतील भागीदारांशी चर्चा करून एकमत साधण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, बुधवारी मतदारसंघ पुनर्रचनेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना द्रवीड मुन्नेत्र कळघम पक्षाचे खासदार कनिमोझी म्हणाल्या, की त्यांच्या पक्षाला निष्पक्ष मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रिया हवी आहे आणि या विषयावर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. त्या म्हणाल्या, की केंद्र सरकार विधेयकात काय मांडते ते पाहू. त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू.