राष्ट्रध्वज घेऊन शुक्रवारी कॅनॉट प्लेसच्या सेंट्रल पार्कमध्ये एकत्र येण्याचे दीपके यांचे समर्थकांना आवाहन

Share

नवी दिल्लीः कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना केवळ तिरंगा फडकवल्याबद्दल तुरुंगात टाकण्यात आले आहे, असा आरोप पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी केला आहे. ‘देशभक्तांनी’ शुक्रवारी (ता. १६) दिल्लीचे व्यावसायिक केंद्र असलेल्या कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये राष्ट्रध्वजासह एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

तिरंगा फडकवणे हा गुन्हा नाही हे आम्ही दाखवून देऊ, असे त्यांनी ‘एक्स’ वाहिनीवर म्हम्हटले आहे. जे दिल्लीला येऊ शकत नाहीत, त्यांनी आपापल्या शहरांमध्ये ‘तिरंगा मार्च’ काढावेत असे आवाहनही त्यांनी केले. आपल्यालाही तुरुंगवास होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

दास आणि रांका यांनी शांतता कराराचे उल्लंघन केल्याबद्दल आणि आंदोलन क्षेत्र म्हणून बंदी घातलेल्या जंतर मंतरमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या आरोपाखाली, पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून तिहार तुरुंगात डांबण्यात आले आहे.

मंगळवारी पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेण्यापूर्वी, तिरंगा हातात घेतलेल्या सीजेपीच्या सदस्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. या संघटनेने म्हटले की, त्यांनी जंतर मंतर आणि आंदोलन करण्याचा आपला हक्क परत मिळवला आहे.

सीजेपीच्या अजिंक्य शिंदे याला सहा महिने शांतता आणि चांगले वर्तन राखण्याच्या बंधनात ठेवण्यात आले असून, वैयक्तिक जामीन व ५ हजार रुपयांच्या हमीवर त्याची सुटका करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बुधवारी सकाळी त्या तिघांना विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!