बीजिंगः एका चिनी इन्फ्लुएन्सरच्या व्हीडिओमध्ये रस्त्यांवर फिरताना दिसत असून, त्यात बांगलादेशतील भंगार, कचरा, गटारे आणि झोपडपट्ट्या दाखवून, हा भारत असल्याचा दावा करतो आहे. बांगलादेशातील ढाका येथील उत्तराच्या सेक्टर १२ आणि लगतच्या टेकपारा परिसरातून १५० हून अधिक चिनी नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून थेट प्रक्षेपण (लाइव्ह-स्ट्रीमिंग) करत आहेत.
बांगलादेशी वृत्तसंस्था ‘प्रथम आलो’च्या वृत्तानुसार, स्थानिकांच्या अंदाजानुसार १५० हून अधिक चिनी नागरिक ढाक्याच्या कमी उत्पन्न असलेल्या भागांमध्ये फिरतात आणि ते भारताची राजधानी नवी दिल्ली असल्याचा दावा करतात. ते पहाटेपासून संध्याकाळपर्यंत रस्त्यांवर व्हीडिओ चित्रिकरण करतात. जरी या आकड्यांना अधिकृतपणे दुजोरा मिळाला नसला तरी, चिनी भाषा समजणाऱ्या चार बांगलादेशींनी लाईव्हस्ट्रीमचे भाषांतर करून धक्कादायक सत्य उघडकीस आणले.
स्ट्रीमर्सचे म्हणणे ऐकलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मते, उत्तरा येथील चित्रिकरणादरम्यान अनेक स्ट्रीमर्सनी त्या ठिकाणाचा उल्लेख ‘नवी दिल्ली’ असा केला. १ नोव्हेंबर रोजी एका लाईव्ह-स्ट्रीम दरम्यान, मियानमियान नावाच्या एका महिलेने म्हटले, ही नवी दिल्ली आहे. वांग वेई नावाच्या दुसऱ्या एका स्ट्रीमरने टेकपारा येथील चहाच्या टपऱ्यांवर विकल्या जाणाऱ्या चहाबद्दल अपमानकारक टिप्पणी केली. काही स्ट्रीमर्सनी बांगलादेशी नागरिकांना गरीब म्हटले आणि ते अत्यंत गरीब व अस्वच्छ परिस्थितीत राहतात असे सांगितले.