बीजिंगः अमेरिकेने पृथ्वीच्या बाह्य कक्षेत शस्त्रे तैनात केल्याची प्रथमच कबुली दिल्यानंतर, चीनने बाह्य अवकाशाला युद्धभूमी बनवण्याच्या या कृतीमुळे कडक शब्दांत इशारा दिला, तर रशियाने अवकाश कोणत्याही शस्त्रापासून मुक्त असले पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विश्लेषकांच्या मते, वॉशिंग्टनने केलेल्या या खुलाशाने एका उघड गुपिताला दुजोरा दिला असला, तरी या घोषणेमुळे बीजिंगसोबतचा तणाव वाढण्याचा आणि अंतराळात शस्त्रास्त्रांची स्पर्धा सुरू होण्याचा धोका आहे.
वेगवान तांत्रिक प्रगतीमुळे प्रेरित झालेल्या, परंतु सर्वसमावेशक कायदेशीर चौकटीचा अभाव असलेल्या, प्रमुख शक्तींच्या लष्करी अवकाश क्षमता मिळवण्याच्या धडपडीत एका नवीन टप्प्याची सुरवात अमेरिकेच्या या घोषणेमुळे झाली आहे.
अमेरिकेकडे कक्षेत असलेली अंतराळ नियंत्रण शस्त्रे आहेत, जी संयुक्त दलाचे शत्रूच्या आक्रमक कारवाईपासून संरक्षण करण्यास सक्षम आहेत, असे अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे, मात्र त्यात या शस्त्रांविषयी अधिक तपशील देण्यात आलेला नाही.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयाला विरोध करत, बाह्य अवकाशाचे शस्त्रास्त्रीकरण करून त्याला रणांगणात बदलण्याबरोबरच तेथे शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू होईल, असा परखड इशारा दिला.
अमेरिकेने आपल्या लष्करी क्षमतांचा विस्तार आणि बाह्य अवकाशातील युद्धाची तयारी थांबवावी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. रशियानेही अंतराळ कोणत्याही शस्त्रांपासून मुक्त ठेवण्याचे आवाहन केले. अवकाशाच्या संपूर्ण निःशस्त्रीकरणाच्या दिशेने काम सुरू ठेवण्यासाठी आम्ही व्यापक आंतरराष्ट्रीय एकजुटीवर अवलंबून आहोत, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले.
अवकाश नियंत्रणामध्ये अवकाश क्षेत्रावर ताबा मिळवण्यासाठी आणि ते नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या मोहिमांच्या क्षेत्रांचा समावेश होतो, ज्यामध्ये शत्रूच्या क्षमतांवर परिणाम करण्यासाठी गतिमान आणि अ-गतिमान साधनांचा वापर केला जातो, असे अमेरिकेने प्रसिद्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या क्षमतांचा वापर आक्रमक आणि बचावात्मक अशा दोन्ही हेतूंसाठी केला जाऊ शकतो, असे त्यात पुढे म्हटले आहे.
अगतिक साधनांमध्ये उपग्रहांना निष्क्रिय करण्यासाठी लेझरचा वापर, किंवा त्यांच्या डेटा लिंक्सचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक किंवा सायबर जॅमिंग यांचा समावेश असू शकतो.
अमेरिकेसाठी त्यांचे दोन प्रमुख भू-राजकीय प्रतिस्पर्धी असलेले रशिया आणि चीन, हे दोन्ही देश अंतराळातील अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी संभाव्य धोके निर्माण करतात. अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या म्हणण्यानुसार, चीन लष्करी आधुनिकीकरण धोरणाचा भाग म्हणून अंतराळ आणि प्रति-अंतराळ क्षमता विकसित करतो आणि चालवतो.
दरम्यान, रशिया अवकाशाला युद्धक्षेत्र मानतो आणि भविष्यातील संघर्षांमध्ये अवकाशातील वर्चस्व हा एक निर्णायक घटक असेल असा त्यांचा विश्वास आहे, असेही त्यात म्हटले आहे.