नवी दिल्ली: खलिस्तानी फुटीरतावादी गुरपतवंत सिंग यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे माजी प्रमुख सामंत गोयल यांच्या विरोधात अमेरिकेत दाखल केलेल्या दिवाणी खटल्यातील आरोप भारताने कपोलकल्पितआणि दुर्भावनापूर्ण असे सांगून फेटाळून लावले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी आपल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, की भारताने हे आरोप आणि खटल्याची प्रक्रिया फेटाळली असून, भारतात न्यायालयीन कागदपत्रे बजावण्याची कोणतीही विनंती भारताच्या नियुक्त केंद्रीय प्राधिकरण, म्हणजेच कायदा आणि न्याय मंत्रालयामार्फतच केली पाहिजे.
पन्नू याने दाखल केलेल्या नुकसान भरपाईच्या दाव्यासंदर्भात, एका अमेरिकी न्यायालयाने जारी केलेले समन्स राजनैतिक मार्गांनी पोचवल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सांगितल्यानंतर ही टिप्पणी करण्यात आली आहे. ‘सिख्स फॉर जस्टिस’ (एसएफजे) या प्रतिबंधित गटाचे कायदेशीर सल्लागार असलेल्या पन्नू यांनी, न्यूयॉर्कमध्ये आपली हत्या करण्याचा कथित कट भारतीय अधिकाऱ्यांनी रचल्याचा आरोप केला आहे. एसएफजे ही भारतात प्रतिबंधित संघटना आहे. विविध दहशतवादी आरोपांखाली भारतीय तपास यंत्रणा पन्नू यांना शोधत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यानुसार, राजनयिक पत्रावर ३० सप्टेंबर २०२६ रोजी स्वाक्षरी करण्यात आली आणि ते ९ ऑक्टोबर २०२६ रोजी वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाला सुपूर्द करण्यात आले. अमेरिकेने म्हटले आहे की, ‘फॉरेन सॉव्हरिन इम्युनिटीज ॲक्ट’ (एफएसआयए) अंतर्गत न्यायालयाच्या विनंतीची अंमलबजावणी करण्यामध्ये त्यांना कोणताही स्वेच्छाधिकार नाही. त्यांनी पुढे असेही सांगितले, की समन्स पाठवण्याचा अर्थ असा लावू नये की खटला कायदेशीर आवश्यकता पूर्ण करतो की नाही, बजावणी वैध होती की नाही, किंवा दाव्यांमध्ये काही तथ्य आहे की नाही, यावर अमेरिकेचे हे मत आहे.
विभागाने असेही म्हटले आहे, की अमेरिकी सरकार या खटल्यातील पक्षकार नाही आणि प्रतिवादींचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. अधिकारक्षेत्रासंबंधी किंवा सार्वभौम-संरक्षणासंबंधी कोणताही बचाव, या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या अमेरिकी न्यायालयासमोरच मांडला गेला पाहिजे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये दाखल झालेल्या एका वेगळ्या अमेरिकी संघीय फौजदारी खटल्याच्या अनुषंगाने हा दावा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतीय नागरिक निखिल गुप्ता यांच्यावर पन्नू याच्या हत्येचा कथित अयशस्वी कट रचण्यात एका भारतीय सरकारी कर्मचाऱ्यासोबत काम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भारताने दिवाणी खटल्यातील आरोप स्वीकारलेले नाहीत. अमेरिकेसोबतची आमची व्यापक जागतिक सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असे ते म्हणाले.
भारतानेही अमेरिकी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगावर तीव्र टीका केली असून, त्याला उघडपणे राजकीय अजेंडा असलेली, पक्षपाती आणि अपुरी माहिती असलेली संस्था असल्याचे म्हटले आहे. जयस्वाल यांनी आयोगावर आणि त्याच्या सदस्यांवर अमेरिकेतील भारतीय समुदायाला लक्ष्य करून होणारे धार्मिक स्थळांवरील हल्ले, द्वेषपूर्ण गुन्हे आणि वांशिक अत्याचारांवर मौन बाळगल्याचा आरोप केला.