नवी दिल्ली: केंद्रीय गृह मंत्रालयाने इमिग्रेशन अँड फॉरेनर्स (एक्झेंप्शन) ऑर्डर, २०२५ मध्ये सुधारणा करून, विशिष्ट श्रेणीतील भारतीय आणि परदेशी नागरिकांच्या प्रवेश, वास्तव्य आणि निर्गमनासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. भारतात प्रवास करणाऱ्या नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांसाठी यापुढे विशिष्ट कागदपत्रांची आवश्यकता लागू करण्यात आली आहे.
गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार, नेपाळ आणि भूतानमधून जमिनीमार्गे किंवा हवाईमार्गे भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा या देशांमध्ये जाणाऱ्या भारतीय नागरिकांना इमिग्रेशन अधिकाऱ्यासमोर सरकारच्या व्हिसा मॅन्युअलमध्ये नमूद केलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करावे लागेल. अधिकाऱ्याने मागितलेली कोणतीही अतिरिक्त माहिती देखील त्यांना द्यावी लागेल.
या सुधारणेनुसार, जमिनीमार्गे किंवा हवाईमार्गे देशात प्रवेश करणाऱ्या किंवा देशाबाहेर जाणाऱ्या नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना त्यांची ओळख पटवण्यासाठी व्हिसा मॅन्युअलमध्ये नमूद केलेले ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. तथापि, नेपाळ किंवा भूतान व्यतिरिक्त इतर देशातून भारतात प्रवेश करणाऱ्या किंवा तेथे जाणाऱ्या नेपाळी आणि भूतानी नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) आणि व्हिसाच्या आवश्यकतांमधून असलेली सध्याची सूट लागू होणार नाही. अशा प्रवाशांकडे वैध पारपत्र असणे आवश्यक असेल.
चीन, मकाव, हाँगकाँग किंवा पाकिस्तानमधून प्रवास सुरू केलेल्या किंवा त्या देशांमधून ट्रान्झिट केलेल्या नेपाळी आणि भूतानी नागरिकांसाठी देखील ही सूट मागे घेतली जाईल. अशा प्रकरणांमध्ये त्यांच्याकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा दोन्ही असणे आवश्यक आहे. या सुधारणेत हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे, की भारत-नेपाळ किंवा भारत-भूतान सीमेमार्गे नेपाळ आणि भूतान व्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्रवास करणाऱ्या किंवा तेथून परत येणाऱ्या भारतीय नागरिकांकडे वैध पारपत्र असणे आणि त्यांनी निर्दिष्ट इमिग्रेशन चौक्यांचा वापर करणे आवश्यक आहे.
सुधारित आदेशात काही विशिष्ट प्रवर्गांना पारपत्र आणि व्हिसाच्या आवश्यकतांमधून सूट देण्यात आली आहे, ज्यामध्ये कर्तव्यावर प्रवास करणारे भारतीय नौदल, लष्कर आणि हवाई दलाचे सदस्य, तसेच त्यांच्यासोबत सरकारी वाहतूक साधनांनी प्रवास करणारे त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे.
९ जानेवारी २०१५ रोजी किंवा त्यापूर्वी भारतात आश्रय घेतलेल्या नोंदणीकृत श्रीलंकेतील तमिळ नागरिकांनाही या सवलतीअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. दुरुस्तीसाठी भारतात येणाऱ्या लष्करी जहाजांचे परदेशी कर्मचारी, जर त्यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडून लष्करी जहाज दुरुस्ती परवाने मिळाले असतील आणि त्यांच्याकडे लष्करी ओळखपत्रे असतील, तर ते या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
आणखी एका महत्त्वपूर्ण तरतुदीमध्ये, सरकारने अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायांच्या सदस्यांसाठी हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिस्ती यांच्यासाठी सूट कायम ठेवली आहे आणि निर्दिष्ट केली आहे. या लोकांमध्ये धार्मिक छळ किंवा छळाच्या भीतीमुळे भारतात आश्रय घेण्यास भाग पडले होते आणि त्यांनी ३१ डिसेंबर २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी देशात प्रवेश केला होता, अशांचा समावेश आहे.
या तरतुदीमध्ये वैध प्रवास कागदपत्रांशिवाय प्रवेश केलेल्या तसेच ज्यांची कागदपत्रे नंतर कालबाह्य झाली आहेत, अशा सर्वांचा समावेश आहे. तथापि, भारतात आपला मुक्काम चालू ठेवण्यासाठी त्यांना योग्य श्रेणीचा व्हिसा मिळवणे आवश्यक असेल. या आदेशात काही तिबेटी नागरिकांना, ३१ डिसेंबर २००९ पूर्वी भारतात प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आणि भारतीय वंशाच्या विशिष्ट व्यक्तींना सशर्त दिलासा देण्यात आला आहे, ज्यांनी मलेशिया किंवा सिंगापूरचे नागरिकत्व मिळवले होते परंतु, अंतिम तारखेपूर्वी भारतात परतले होते.