नवी दिल्ली: फिलिपीन्सचे संरक्षण मंत्री गिल्बर्ट टेओडोरो यांनी बुधवारी नवी दिल्लीत मनोहर पर्रीकर संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेच्या (एमपी-आयडीएसए) परिषदेत, भारतासोबतच्या संबंधांबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. भारताबरोबरचे संबंध केवळ शस्त्र खरेदीपुरते मर्यादित न ठेवता, शस्त्रास्त्र उत्पादन, संयुक्त सागरी सीमा सुरक्षा आणि चीनकडून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यासाठी संयुक्त धोरणे विकसित करण्याच्या दिशेने व्हावे, असे मत व्यक्त केले.
अलिकडच्या वर्षांत फिलिपीन्स आणि भारत यांच्यातील संबंध लक्षणीयरीत्या अधिक घट्ट झाले आहेत. ब्रह्मोस क्षेपणास्त्र करार, हे त्यापैकी एक प्रमुख उदाहरण आहे. पर्रीकर संरक्षण केंद्रात बोलताना टेओडोरो म्हणाले, की ब्रह्मोस क्षेपणास्त्र वापरणारा फिलिपीन्स हा जगातील पहिला देश आहे, पण त्यांनी भारतासोबत इतर शस्त्रास्त्रांच्या सह-उत्पादनाची गरज असल्याचे स्पष्ट केले. भारतासोबत हवाई संरक्षण प्रणाली विकसित करण्याची गरजही त्यांनी प्रकट केली.
फिलिपीन्सने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांना आपल्या देशाच्या गरजेनुसार अनुकूल करण्यासंदर्भात आपल्या गरजांची यादी भारतीय अधिकाऱ्यांकडे सादर केली आहे. वृत्तानुसार, फिलिपीन्स आणखी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासंदर्भात नवी दिल्लीसोबत चर्चा करत आहे.
फिलिपीन्सने भारतासोबत ३७५ दशलक्ष डॉलर्सचा ऐतिहासिक ब्रह्मोस करार केला होता आणि आता ते नवीन ब्रह्मोस कराराच्या शोधात आहेत. टिओडोरो म्हणाले, की ब्राह्मोस करार हा भारताच्या तांत्रिक क्षमता आणि सुरक्षा वचनबद्धतेवरील फिलिपीन्सच्या अढळ विश्वासाचे प्रतीक आहे. चीनला दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के भागावर एकतर्फी नियंत्रण मिळवायचे आहे आणि त्यांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी फिलीपीन्सला ‘सहयोगी देशांची’ गरज आहे, कारण आपला देश एकटे लढू शकत नाही.
‘एमपी-आयडीएसए’ला संबोधित करताना, टेओडोरो म्हणाले, की देशाला समान आव्हानांना तोंड देणाऱ्या समविचारी देशांची गरज आहे आणि फिलीपिन्स भारतासोबत अशाच प्रकारच्या धोरणावर काम करत आहे. त्यांनी अंतराळ-संबंधित धोक्यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले, की फिलीपीन्सला अंतराळ तंत्रज्ञानात भारतासोबत सहकार्य वाढवायचे आहे. एका विशाल किनारपट्टीच्या संरक्षणाची जबाबदारी फिलीपीन्सवर असल्याने, त्यांना भारतासोबत संयुक्त उपग्रह ट्रॅकिंग आणि पृथ्वी निरीक्षणावर काम करायचे आहे.
२०१६ मध्ये, स्थायी लवाद न्यायालयाने (पीसीए) दक्षिण चीन समुद्रावरील चीनचा एकतर्फी दावा फेटाळला. तेव्हापासून, चीनने दक्षिण चीन समुद्रावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृत्रिम बेटे, लष्करी तळ, रडार केंद्रे आणि क्षेपणास्त्र केंद्रे उभारली आहेत. असे करून, दक्षिण चीन समुद्राच्या वेगवेगळ्या भागांवर दावा करणाऱ्या देशांना घाबरवण्याचा त्याचा प्रयत्न आहे.
चीन ‘नऊ-रेषांच्या रेषे’चा हवाला देतो आणि दक्षिण चीन समुद्राच्या ९० टक्के भागावर आपला हक्क सांगतो. तथापि, फिलीपीन्सची चिंता दक्षिण चीन समुद्रापासून पॅसिफिक महासागरापर्यंत पसरलेली आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणांचा तो सर्वात मोठा बळी आहे. फिलीपीन्सने सातत्याने असा युक्तिवाद केला आहे, की चीनचे एकतर्फी दावे केवळ त्याच्या सार्वभौमत्वालाच नव्हे, तर व्हिएतनाम, मलेशिया आणि ब्रुनेई यांसारख्या इतर शेजारी देशांच्या सार्वभौमत्वालाही एक महत्त्वपूर्ण धोका निर्माण करतात.
भारत सरकारचे ‘अॅक्ट ईस्ट पॉलिसी’ आणि फिलिपीन्सची इंडो-पॅसिफिक रणनीती एकमेकांशी घट्टपणे जोडलेली आहेत आणि यातून दोघांनाही फायदा होऊ शकतो. चीनच्या एकतर्फी आणि आक्रमक प्रादेशिक दाव्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय कायद्याच्या समर्थनासाठी भारत आणि फिलिपीन्स राजनैतिक मंचांवर एकत्र उभे राहू शकतात. हे एक मोठे प्रतिसंतुलन ठरेल. याशिवाय, भारत फिलिपीन्स, जपान आणि अमेरिका यांसारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांसोबत काम करून, लघु-पक्षीय संवाद आणि सुरक्षा चौकट अधिक मजबूत करू शकतो.