भारतातही बांगलादेश, फ्रान्ससारखा हिंसाचाराचा विरोधकांचा कट होता; किरेन रिजिजू यांचा आरोप

Share

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी विरोधी पक्ष आणि भारतविरोधी गटांवर देशात हिंसाचार आणि अशांतता भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, बांगलादेश आणि अगदी अलीकडे फ्रान्समध्ये झालेल्या घटनांप्रमाणेच भारतातही आंदोलने आणि दंगली भडकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

एका पोस्टमध्ये रिजिजू यांनी असा दावा केला की, काही राजकारण्यांनी आणि जनविरोधी घटकांनी तरुणांना भडकवून रस्त्यांवर हिंसाचार, जाळपोळ आणि लूटमार करण्याचा प्रयत्न केला.

हा धोकादायक कट रचणारे हे विसरले आहेत, की भारत हा बांगलादेश किंवा फ्रान्स नाही. भारतात केवळ निष्पक्ष निवडणुकांद्वारेच सत्तांतर होऊ शकेल. ‘डीप स्टेट’चा भाग असलेल्या जॉर्ज सोरोस यांच्या आर्थिक मदतीवर ते अशक्य आहे, असे रिजिजू म्हणाले.

आपल्या निवेदनासोबतच केंद्रीय मंत्र्यांनी एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘एआयएसए’च्या अध्यक्षा नेहा बोरा आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण हे सत्तापालटाची मागणी करताना दिसत आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांचे निवेदन आले आहे. या आंदोलनांदरम्यान, विरोधी पक्षनेते आणि विद्यार्थी संघटनांनी सत्तापालटाची मागणी केली असून, त्यामुळे एक नवीन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

यापूर्वी, प्रशांत भूषण यांनी, हे आंदोलन म्हणजे सत्तापालट घडवून आणण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न असल्याचा सरकारचा दावा फेटाळून लावला होता. ते म्हणाले, की सरकार सातत्याने म्हणत आहे की, ही सरकार बदलण्याची विरोधी पक्षांची मोहीम आहे. आम्ही केवळ या देशातील निवडणूक लोकशाही जपण्याचे आवाहन करत आहोत.

ते म्हणाले, की जर अशा प्रकारचे क्रौर्य चालूच राहिले, तर सत्तांतर नक्कीच होईल. आम्हा सर्वांनाच सत्तांतर हवे आहे. त्यात काही गैर आहे का? सत्तांतर हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाही हक्क आहे आणि सरकारविरोधात असंतोष व्यक्त करणे हा गुन्हा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!