नवी दिल्ली: ‘बांगलादेशने आम्हाला मार्ग दाखवला,’ या विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांच्या वक्तव्यामुळे ही भारतामध्ये ‘सत्तापालट करण्याची उघड कबुली’ असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी केला आहे. भाजपला आता पुरावा मिळाला आहे, असे त्यांनी सांगितले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्समध्ये डॉक्टरेट सुरू करण्यापूर्वी दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या नेहा बोरा (वय २९) या विद्यार्थी नेत्याने, एका तारीख नसलेल्या मुलाखतीत असे म्हटले आहे, की भारत सध्या अनुभवत असलेली ‘जनरेशन झेड’ चळवळ सर्वप्रथम बांगलादेशात सुरू झाली. बांगलादेश हा नवी दिल्लीचा सामरिक भागीदार आणि एक जवळचा मित्र देश असून, तो देशाच्या सीमा सुरक्षेसाठी, विशेषतः ईशान्येकडील राज्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.
या देशात सर्वत्र दिसणारी ‘जनरेशन झेड’ चळवळ सर्वप्रथम बांगलादेशात सुरू झाली आणि आम्हाला मार्ग दाखवल्याबद्दल व या देशातील तरुणांना पाठिंबा दिल्याबद्दल तुमचे अभिनंदन, असे त्या भाजप नेत्यांनी शेअर केलेल्या क्लिपमध्ये म्हटल्याचे ऐकता येते.
राहुल गांधींची पोस्टर गर्ल नेहा बोरा म्हणते, की ‘क्रांतीसाठी बांगलादेशने आम्हाला मार्ग दाखवला!’ ही सत्तापालटाची उघड कबुली आहे! राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी भारतीय लोकशाहीसाठी धोकादायक आहेत!
बोरा यांनी अधोरेखित केले, की बांगलादेशप्रमाणेच भारतदेखील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कथित निवडणूक गैरप्रकारांवरून आंदोलन करत असून, भारतात लोकशाही आणि मतदार हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी लढा देत आहे.
आम्हाला माहीत आहे की बांगलादेशात सुरू झालेली चळवळ लोकशाही आणि मतदानाच्या हक्कांसाठी होती. आज तरुण ज्या चळवळीत सहभागी होत आहेत आणि तिचे नेतृत्व करत आहेत, ती चळवळसुद्धा लोकशाही आणि मतदानाच्या हक्कांसाठीच आहे, असे त्या म्हणाल्या.