रियाधः सोदी अरेबियावर येमेनमधील हूती बंडखोरांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, राजधानी रियाधमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावरील क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये १३ लोक मृत्यूमुखी पडले तर ३०० हून अधिक जखमी झाले आहेत. भावी काळात परिस्थिती आणखी धोकादायक होऊ शकते, हे लक्षात घेऊन सौदी अरिबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या एका राजवाड्यातून दुसऱ्या राजवाड्यात हलविण्यात येत आहे.
गेल्या मंगळवारी सौदी अरेबियाचे युवराज शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले होते. ते एका राष्ट्रीय रक्तदान मोहिमेसाठी रक्तदान करत होते. तेव्हापासून, सौदी अरेबियावरील हूतींचे हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. रक्तदान केल्यापासून ते सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. त्यांच्या हालचालींची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचा हवाल्याने मिळालेल्या वृत्तानुसार, त्यांना कडक सुरक्षा असलेल्या आणि बंकरने सुसज्ज असलेल्या राजवाड्यांमध्ये सतत हलविण्यात येत आहे.
सौदी अरेबिया आणि येमेनच्या हूती बंडखोरांमधील संघर्ष तीव्र होत असल्याने आणि सुरक्षेचे धोके वाढत असल्याने, एक विशेष सुरक्षा पथकही त्यांच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. शनिवारी, सौदी अरेबियाला गेल्या दशकातील सर्वात भीषण हल्ल्याला सामोरे जावे लागले. राजधानीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर किमान एक क्षेपणास्त्र आदळले.
हल्ल्याची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराण युद्धाशी संबंधित संघर्षांमध्ये अमेरिका किंवा तिच्या आखाती मित्र राष्ट्रांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात प्राणघातक हल्ला होता. त्यांनी सांगितले की, एका २८ वर्षीय इजिप्शियन विमान परिचारिकेचा हात उडून गेल्याने रक्तस्रावाने तिचा मृत्यू झाला. अवयव गमावलेल्या अनेक बळींपैकी ती एक होती.
या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद आहे. गेल्या पाच दिवसांत त्यावर चार वेळा हल्ला झाला आहे. सौदीचे ऊर्जा मंत्री राजपुत्र अब्दुल अजीज बिन सलमान यांनी हल्ल्यांचे गांभीर्य लक्षात घेता, सौदी अरेबियाचे प्रत्युत्तर तेवढेच गंभीर असेल, असा इशारा दिला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हूतींवरील सौदी हल्ल्यांमध्ये सामील होण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मक्का करारातील रियाधच्या मित्र राष्ट्रांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे.
दोन्ही बाजूंमध्ये भीषण युद्ध चालू असून, २०२२ मध्ये एका कमकुवत युद्धविरामावर सहमती झाली होती. इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर, या वर्षी जुलैमध्ये तो करार गुंडाळून ठेवण्यात आला आहे. इराणहून येणारे विमान सना विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना सौदींनी हवाई हल्ला केल्याचा आरोप करून, हूतींनी आपले हल्ले पुन्हा सुरू केले आहेत.
हूतींना इराणचा पाठिंबा असून ते या प्रदेशातील इराणच्या सर्वाधिक शस्त्रसज्ज समर्थकांपैकी एक आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई म्हणाले की, तेहरान अरबी द्वीपकल्पातील घडामोडींबद्दल अत्यंत चिंतित आहे. या लढाईचा केवळ इस्रायली राजवटीलाच फायदा होईल.
सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी रविवारी रात्री तणावाच्या वाढीवर चर्चा केली. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की, त्यांनी लष्करी भूमिकेवर आग्रह धरण्याविरुद्ध आणि राजकीय परिस्थितीकडे दुर्लक्ष करण्याविरुद्ध इशारा दिला आहे. सौदी आणि हूती यांच्यात संवाद सुरू करण्यासाठी तेहरान मदत करू शकेल.
२०१५ मध्ये सौदी आणि हूतींमध्ये लढाई सुरू झाली, जेव्हा सौदी अरेबियाने सरकारच्या वतीने येमेनच्या गृहयुद्धात प्रवेश केला होता.