नवी दिल्ली: नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आपल्या सहकाऱ्यांसह आंदोलन करण्यासाठी पोचलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका, यांना दिल्ली पोलिसांनी पुन्हा एकदा ताब्यात घेतले आहे. जंतर मंतरजवळ दिल्ली पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
सौरभ दास यांनी स्वतःच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अटकेचा व्हीडिओ प्रसृत केला आहे. त्यात सौरभ दास आपल्या सहकाऱ्यांसोबत ‘इन्किलाब जिंदाबाद’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देताना दिसत आहेत. यावेळी, दोन्ही सीजेपी नेत्यांसोबत आंदोलन करणारे तरुण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसतात.
आम्ही जंतर मंतरला पोहोचलो आहोत. आणि आता आम्हाला ताब्यात घेण्यात आले आहे, पण हा आपल्या सर्व तरुणांसाठी एक संदेश आहे. आपण हे करू शकतो. ‘ज्ञानू’, तुझा खेळ संपला आहे, असे या व्हीडिओत सौरव दास म्हणताना दिसतो आहे.
दिल्ली पोलिसांनी आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना यापूर्वी १० ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते. त्यावेळी सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके हेदेखील त्यांच्यासोबत होते. हे तिघे आंदोलनासाठी मुंबईहून दिल्लीला विमानाने आले होते.