नवी दिल्ली: विरोधी पक्षांच्या इंडी अलायन्सतर्फे आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून, एक भारतीय म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीशांना निवेदन देणार आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. हा मोर्चामध्ये पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती नसतील. मतचोरी थांबवा, एसआयआर बंदी, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, आदी मागण्या सरन्यायाधीशांना देण्यात येणाऱ्या निवेदनात असतील, असे त्यांनी सांगितले.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात रणकंदन सुरु असतानाच, इंडी अलायन्सने हा निर्णय घेतला आहे. देशातील तरुण, सर्व विरोधी पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवरविश्वास असणारे व भारतीय संविधानाच्या पाठीशी उभे राहणारे सर्वजण या मोर्चात सामील होतील, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी, अमित शहा, अजय डोवाल, मोहन भागवत हे भारताचा आवाज दाबू शकत नाहीत. हे डरपोक आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना माघार घ्यावीच लागेल. आम्ही सर्वजण प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीने एकत्र येऊन मोर्चा काढू. घाबरू नका उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढेल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केल्याचे त्यांनी जारी केलेल्या एका व्हीडिओमध्ये म्हटले आहे.