नवी दिल्ली: ‘आम्ही हे करून दाखवू’ (वुई विल डू इट) ही नवी घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे दिली. सत्तेत प्रमुख पदावरील (मुख्यमंत्री ते पंतप्रधान) २५ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त ‘विकसित भारत संकल्प सभेत’ ही घोषणा दिली आहे. भारताला विकसित राष्ट्र बनवू, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी दृढ संकल्प सोडला आहे. याचवेळी त्यांनी निवडणुकीदरम्यान होणाऱ्या जाती-पातीच्या राजकारणावर आणि मतपेटीच्या राजकारणाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली.
मोदी यांनी बुधवारी सार्वजनिक प्रशासनातील २५ वर्षे पूर्ण केली. या निमित्त दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोदी यांनी देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आभासी माध्यमातून संबोधित केले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यावेळी सार्वजनिक जीवनातील हा टप्पा आपण कधी गाठू, अशी कल्पनाही त्यांनी केली नव्हती.
सरकारचे प्रमुख म्हणून देशाची सेवा करत असताना आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत, असे सांगून, या यशाचे श्रेय त्यांनी जनतेच्या अखंड आशीर्वादाला दिले. भाजप, एनडीए तसेच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
मी एकटा आहे असे मला कधीच वाटले नाही. असे अगणित स्वयंसेवक आहेत जे भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचे रक्षक आहेत, आणि त्यांचा एकच उद्देश आहे, भारताची सेवा करणे. ते याच भावनेने जगतात आणि प्रत्येक क्षणी स्वतःला आठवण करून देतात. आम्ही सेवक आहोत. आम्ही मानवतेचे सेवक आहोत. प्रत्येक स्वयंसेवक आणि कार्यकर्त्याला आदराने वंदन करतो, जे वचनबद्धतेने आणि निष्ठेने राष्ट्राची सेवा करत आहेत, असे त्यांनी भावुक होऊन सांगितले.
पंतप्रधान मोदींनी आपल्या राजकीय जीवनातील विशिष्ट घटनांचा उल्लेख केला. २००१ चा भूजमधील विनाशकारी भूकंपाचा समावेश आहे. या भूकंपामुळे आपल्याला पुनर्बांधणीत दृढ राहायला शिकवले. चांद्रयान मोहीम, जिने आपल्याला अपयशातून पुन्हा उभे राहायला शिकवले आणि कोरोना महामारी, जिने राष्ट्राच्या सामूहिक चेतनेचे महत्त्व जाणवून दिले, असे त्यांनी सांगितले. कटू-मधुर अनुभवांतून पुढे जाण्याची प्रेरणा दिल्याबद्दल त्यांनी प्रसारमाध्यमांचेही आभार मानले.
सांस्कृतिक वारसा आणि उदात्त विचारांनी समृद्ध असलेल्या राष्ट्राच्या सेवेने त्यांना नेहमीच बळ दिले आहे, यावर पंतप्रधानांनी जोर दिला.
वेदांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत, ज्या राष्ट्राने सातत्याने महान विचारांचे आचरण केले आहे, ज्या राष्ट्राचा सांस्कृतिक वारसा हजारो वर्षांचा आहे. ज्या राष्ट्राने मानवतेवरील मानवतेचा विश्वास पुन्हा जागृत केला, अशा राष्ट्राची सेवा करताना आपल्याला एकदाही एकटेपणा जाणवला नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हा दिवस केवळ स्मरणासाठी नसून भविष्यासाठी एका गंभीर वचनाचे नूतनीकरण करण्याचा आहे. हा दिवस त्या वचनाचा पुनरुच्चार करण्याचा आहे. आम्ही ते निश्चितपणे साध्य करू, असा निर्धार व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आम्ही ते साध्य करू. आम्ही ते करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू, अशी प्रतिज्ञा करत त्यांनी २०४७ पर्यंतच्या राष्ट्राच्या विकास प्रवासाची दिशा निश्चित केली.