एमपीएससी विद्यार्थी आंदोलन; पुणे शहर ठप्प होईल; रोहीत पवारांचा सरकारला दोन दिवसांचा निर्वाणीचा इशारा

Share

पुणेः सीजेपीचे अभिजीत दीपके यांनी आवाहन केल्याप्रमाणे पुणे शहर ठप्प होऊ शकते. आता हे एमपीएससीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक ठरवतील. त्यावेळी पुणेकरांनी या विध्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा. ७ किंवा ८ ऑक्टोबरला राहुल गांधी येण्याची शक्यता आहे. त्यादिवशी १ लाख विद्यार्थी पुण्यात रस्त्यावर असतील, असा आमचा अंदाज आहे. एक तर हे विद्यार्थी पुणे बंद करतील किंवा मुंबईत मंत्रालयावर धडकतील, असं रोहित पवार म्हणाले. आज राज ठाकरे, आदित्य ठाकरे आंदोलनात येणार आहेत. सरकारला दोन दिवसांचा निर्वाणीचा इशारा देतो आहे, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. आंदोलनात विविध मागण्यांमुळे तीन गट पडले आहेत. मात्र एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आहे की राजकीय आखाडा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हर्षवर्धन सपकाळांपासून ते संजय राऊतांपर्यंत अनेक पक्षांच्या नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली. शरद पवारांनीही या आंदोलनात लक्ष घातले आहे. आता आज दुपारी ४ वाजता मनसेप्रमुख राज ठाकरे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची भेट घेणार आहेत. तसेच मनोज जरांगे पाटील हे देखिल या आंदोलनाला भेट देणार आहेत. याचदरम्यान, एमपीएससीच्या आंदोलनात पहिल्या दिवसांपासून सहभागी असलेले शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

रोहित पवारांनी चर्चेची भूमिका घ्यावी. ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढतात. त्यांनी आंदोलन करावे, पण विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी केले होते. हे राजकीय व्यासपीठ नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भल्यासाठीच आम्ही मंत्रालयात बसतो. आपण विद्यार्थ्यांसाठी एकत्रित काम करू.

नितेश राणे आपले मित्र आहेत. त्यांनी विध्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मिटवावेत. आता सरकार विरोधात वातावरण पेटल्याने ते आपल्याला मंत्रिपद देऊन सोबत काम करायचे म्हणत आहेत. याचा अर्थ त्यांना लक्षात आले आहे, की आता आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे त्यांनी धाडस दाखवून विरोधात बसावे. जेव्हा आमची सत्ता येईल, तेव्हा सोबतीने काम करू. पण सद्यस्थितीत नितेश राणे भरकटलेले दिसत आहेत, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

विद्यार्थ्यांचा प्रश्न हा राजकारणाचा विषय नाही, हे नितेश राणे यांनी व्यक्त केलेल्या भावनेशी आम्ही संपूर्ण सहमत आहोत. सत्याग्रह आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगतो आहे. दुर्दैवाने सत्ताधारी पक्षाचेच काही आमदार या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याबाबत आपण त्यांनाही कानपिचक्या दिल्या तर बरे होईल, असे रोहित पवार म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नाचे मूळ ठरलेल्या एमपीएससीचे भ्रष्ट अध्यक्ष भिमनवार यांचा राजीनामा घेऊन या संस्थेतील भ्रष्टाचाराची साफसफाई करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी सरकारकडे केल्यास आपल्यासह सर्व विद्यार्थी तुमचे आभार मानतील, असेही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!