मुंबईः येथील शिवाजी पार्कमध्ये स्थानिक नागरिक आणि कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार त्यांचा आंदोलनाला विरोध नाही, परंतु शिवाजी पार्कमध्ये ते होत असल्याचा विरोध आहे. स्थानिकांनी सीजेपीविरोधात आंदोलन करण्याचे संकेतही दिले आहेत. यावरून सीजेपीच्या आंदोलनाला स्थानिकांचाच विरोध असल्याचे दिसते.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे (आप) नेते सौरभ भारद्वाज यांना ताब्यात घेण्यात आले. ते निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यासाठी आले होते. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या पक्षाने केली आहे.
मुंबई पोलिसांनी सीजेपीच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम म्हणाले, लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. परंतु, जवळच रुग्णालय आणि मोठ्या प्रमाणात रहिवासी राहात असलेल्या शिवाजी पार्कची निवड करून, रुग्णालयातील रुग्णांची गैरसोय करायची आहे का? शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यात त्यांचा हेतू काय आहे?
दरम्यान, नवी दिल्लीत योगेंद्र यादव या आंदोलनाबाबत म्हणाले, की घाबरलेल्या केंद्र सरकारने जंतर मंतरच्या आसपासची ११ मेट्रो स्थानके बंद केली आहेत. इतरही बरीच तयारी झाली आहे. निवडणुकांमधील मुख्य आरोपी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग चालवण्याची तयारी केली पाहिजे. झेंडा तिरंगा असेल आणि चित्र बापूंचे असेल. गांधी जयंतीच्या दिवशी आपण अहिंसेचा मार्ग अवलंबला पाहिजे.
दिल्लीतील आंदोलनाबाबत बोलताना प्रशांत भूषण यांनी ‘एक्स’वर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की आज जंतर मंतर आणि देशाच्या इतर भागांमध्ये होणारी आंदोलने ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या मालकांविरुद्ध आहेत. ते लोकशाहीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
जंतर मंतर आणि देशातील इतर ठिकाणी आजचे आंदोलन हे ज्ञानेश कुमार आणि त्यांच्या साथीदारांनी, आपल्या लोकशाहीचे अपहरण केल्याच्या विरोधात नागरिकांनी केलेला निषेध आहे. जरी अनेक संघटना आणि पक्षांनी या आवाहनाला पाठिंबा दिला असला, तरी हे पक्षपाती आंदोलन नाही. लोकांनी नागरिक म्हणून पुढे यावे, असेही ते म्हणाले.