मुंबई : स्वीडनच्या संसदेत निवडून आलेल्या भारतीय वंशाच्या खासदार नीला विखे-पाटील यांनी महाराष्ट्रातील आपले काका आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे-पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “गेल्या दशकभरापासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क नसताना, आता माझ्या राजकीय यशाचे श्रेय ते लाटण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशा शब्दांत नीला यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नीला या राधाकृष्ण विखे-पाटील यांचे मोठे भाऊ आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. अशोक विखे-पाटील यांच्या कन्या आहेत. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत त्या स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ‘ग्रीन पार्टी’च्या तिकिटावर खासदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत. महाराष्ट्रातील राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाशी संबंधित व्यक्ती थेट स्वीडनची खासदार झाल्याने भारतात विशेषत: महाराष्ट्रात याची चांगलीच दखल घेतली गेली.
View this post on Instagram
स्टॉकहोम येथून पीटीआयशी बोलताना नीला म्हणाल्या, “कोणीतरी मला एक व्हिडिओ पाठवला, ज्यामध्ये सुजय विखे-पाटील असा दावा करताना दिसतात की, महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असला, तरी विखे-पाटील कुटुंबातील एक सदस्य स्वीडनमध्ये खासदार झाला आहे! हे ऐकून मला अत्यंत आश्चर्य वाटले. गेल्या १०-१२ वर्षांत माझा माझ्या काकांशी किंवा चुलत भावाशी कोणताही संबंध किंवा संवाद राहिलेला नाही. मी नियमितपणे भारतात येत असते, पण मी त्यांना कधीही भेटलेले नाही. आता मी स्वीडनच्या संसदेत निवडून आल्यानंतर मात्र ते माझ्या यशाचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत.”
भाजपचे नेते डॉ. सुजय विखे-पाटील यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. आपल्या काकांच्या पक्षबदलाच्या राजकारणावर नीला विखे-पाटील यांनी म्हटले की, “त्यांचे राजकारण आणि माझी विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. मी ज्या पक्षाशी बांधील आहे तो पक्ष मी कधीही सोडणार नाही; परंतु त्यांनी वारंवार पक्ष बदलले आहेत, असे त्यांनी सांगितले. राधाकृष्ण विखे-पाटील हे २०१९ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले असून त्यापूर्वी ते काँग्रेस आणि शिवसेनेतही राहिले आहेत. खासदार झाल्याबद्दल काकांनी फोन करून अभिनंदन केले, ही त्यांची चांगली गोष्ट होती; परंतु त्या पलीकडे आमचे कौटुंबिक किंवा राजकीय संबंध नाहीत.’
दरम्यान, नीला यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असून त्यांनी ‘गोथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेस’मधून अर्थशास्त्र आणि कायद्यात एमबीए केले आहे. खासदार होण्यापूर्वी त्यांनी स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात राजकीय सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या संसदेत त्या ग्रीन पार्टीच्या मुख्य आणि प्रभावी नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
One thought on “स्वीडनमध्ये खासदार झालेल्या नीला विखे यांचा काका-चुलत भावाला टोला; म्हणाल्या…”