पुणे महानगरपालिकेच्या शाळेत गणरायाचे उत्साहात स्वागत; विद्यार्थ्यांना संस्कारांची शिदोरी…

pmc-school-ganpati
Share

पुणे (संदिप कद्रे): पुणे महानगरपालिकेच्या मनपा शाळा कोद्रेवस्ती, केशवनगर, हडपसर या शाळेमध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सर्जनशीलता, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत विविध शैक्षणिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणेशोत्सव आनंदमय तसेच ज्ञानवर्धक पद्धतीने साजरा केला.

गणेशमूर्तीची स्थापना करताना विद्यार्थ्यांना गणेशोत्सवाचे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. ‘श्रीगणेशा ते पर्यावरणसंरक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कागदी फुलांच्या माळा, तोरणे तसेच पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तूंचा वापर करून वर्गाची आकर्षक सजावट केली. गणेशोत्सवानिमित्त चित्रकला, रंगभरण, सुंदर हस्ताक्षर, गणेशविषयक प्रश्नमंजुषा, गोष्ट सांगणे, कविता वाचन, भाषण, आरती आणि घोषवाक्य लेखन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळाली.

‘मातीपासून गणेशमूर्ती’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने गणेशमूर्ती तयार केल्या. शाडू मातीचा वापर, नैसर्गिक रंगांचे महत्त्व तसेच जलप्रदूषण टाळण्याच्या उपायांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासोबतच ‘निर्माल्यापासून खतनिर्मिती’ आणि कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वच्छता, एकता, सहकार्य, पर्यावरणसंवर्धन, वेळेचे नियोजन आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व पटवून देण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणाचे रक्षण करूया’ अशा घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापक श्रीमती मंजुषा काकडे व शिक्षकवृंद स्मितल गायकवाड व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवातून शिक्षण आणि शिक्षणातून संस्कार देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी व संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!