संजय राऊत म्हणजे मातोश्रीच्या कुंडलीतील अमंगल ग्रह; दिशा सालियन प्रकरणावरून नवनाथ बन यांचा तुफान हल्लाबोल

Share

मुंबईः ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत दिशा सालियन प्रकरणात ठाकरे कुटुंबाला नाहक बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला. त्यांनी राणे आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्याचा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी आक्रमक शैलीत समाचार घेतला. राऊत हे मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय कुंडलीतील अमंगल ग्रह असल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडीची अडीच वर्षे सत्ता होती, तेव्हा कणकवली प्रकरणाची चौकशी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दिशा सालियन प्रकरणावर बोलताना बन म्हणाले, की दिशा सालियन प्रकरण जिवंत ठेवून आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा संजय राऊतांचा डाव आहे. आदित्य ठाकरेंना राजकीय पटलावरून दूर करण्यासाठी संजय राऊतांचे षडयंत्र असल्याचा दावाही त्यांनी केला. दिशा सालियन प्रकरणावर राऊत रोज बोलतात, त्यांच्याकडे पुरावे असतील तर तपास यंत्रणांसमोर सादर करा. आदित्य ठाकरेंविरोधातील राजकीय वैरातून दिशा सालियन प्रकरणाचा वापर होत असेल, तर राऊत यांनी पुरावे द्यावेत, असे ते म्हणाले.

‘ईव्हीएम फाईल’च्या गप्पांपूर्वी ‘पाटकर फाईल’चा इतिहास महाराष्ट्राला सांगा, असा सल्ला बन यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यापूर्वी संजय राऊतांनी स्वतःच्या ‘पाटकर फाईल’कडे पाहावे. ‘फाईल’च्या राजकारणापेक्षा स्वतःच्या आरोप-प्रत्यारोपांचा इतिहास महाराष्ट्राला आठवतो आहे. मोदींना जनतेचा तिसऱ्यांदा कौल मिळाला आहे. राऊतांनी आधी आपल्या राजकीय इतिहासाचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला बन यांनी लगावला.

ममता बॅनर्जींच्या राजकारणाचे समर्थन करण्याआधी पश्चिम बंगालमधील हिंसाचाराचा इतिहास त्यांनी पाहावा. गुंडशाहीच्या आरोपांनी गाजलेल्या राजकारणाचे समर्थन राऊतांनी करू नये. पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेला कौल विसरून ममता बॅनर्जींची पाठराखण का करतात. ममतांच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले, मग संजय राऊतांना त्यांचे समर्थन कशासाठी? असा प्रश्नही बन यांनी उपस्थित केला.

ममतांना फुटबॉलचे चिन्ह मिळाले, जनतेने मात्र महाविकास आघाडीचा राजकीय फुटबॉल केला, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक आयोगावर आरोप करण्यापूर्वी संजय राऊतांनी जनतेच्या नकाराचे आत्मपरीक्षण करावे. राहुल गांधींची स्तुती आणि निवडणूक आयोगावर टीका एवढेच राऊतांच्या राजकारणात उरले आहे. जनतेने नाकारले म्हणून निवडणूक आयोगाला दोष देऊ नका तर आधी आत्मपरीक्षण करा, असा टोलाही राऊतांना बन यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!