केवळ सत्यच करेल ‘झुठ की गूंज’चा पराभव; पंतप्रधान मोदींनी गुजरातमध्ये साधला राहुल गांधींवर निशाणा

Share

नवी दिल्ली: विरोधक ‘झूठ की गुंज’च्या नावाखाली तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण तरुण नेहमीच सत्याच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाच्या ‘छात्रों की गूंज’ मोहिमेवर अप्रत्यक्ष टीका केली. काँग्रेससह विरोधी पक्षांचा उल्लेख करत, पंतप्रधानांनी तरुणांना खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या मोठ्या दाव्यांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

गुजरातच्या बडोदा येथे एका कार्यक्रमात ३५,००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर ते एका मोठ्या जनसमुदायाला संबोधित करत होते. २०१४ नंतर भारताने ५०,००० आधुनिक रेल्वे डबे बांधले. काँग्रेस सरकार १० वर्षांत ५०,००० शौचालयेसुद्धा बांधू शकले नाही.

सभागृहात क्वीनचे ‘वी विल रॉक यू’ आणि त्यानंतर सुपरहिट चित्रपट ‘धुरंधर’मधील ‘आरी आरी’ हे गाणे वाजवण्यात येत होते. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुण प्रेक्षकांच्या जोरदार जल्लोषात सभामंडपात शानदार प्रवेश केला.

पंतप्रधानांची ही टिप्पणी, एका राजकीय वेबसाइटने राहुल गांधींच्या भाषणांची केलेल्या तथ्य-तपासणीवर आधारित होती. या वेबसाइटनुसार, राहुल गांधींनी त्यांच्या बहुतेक भाषणांमध्ये खोटी विधाने केली होती. राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ मोहिमेसंबंधित चार वेगवेगळ्या कार्यक्रमांमधील ४० विधानांची तपासणी केली आणि त्यापैकी २९ विधाने खोटी व ११ दिशाभूल करणारी आढळली.

‘नमो फॉर विकसित भारत’ नावाच्या या कार्यक्रमात पायाभूत सुविधा प्रकल्पांसंदर्भात अनेक घोषणा करण्यात आल्या. जेएनपीटी (मुंबई) ते बडोदादरम्यान एक डबल-स्टॅक कंटेनर मालगाडी चालवण्यात आली. म्हणजे, या मालगाडीत एकावर एक कंटेनर रचले होते. या एकाच फेरीत, मुंबई ते बडोदा दरम्यान वाहतूक केलेल्या मालाचे प्रमाण २५० हून अधिक ट्रकच्या मालवाहतुकीइतके होते, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा ट्रक चालकांवर होणाऱ्या परिणामांवर विरोधी पक्षांकडून आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येईल. डबल स्टॅक कंटेनरची वाहतून मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर ट्रक चालकांचे काय, इतके ट्रक कुठे जाणार, ज्यांनी ट्रक विकत घेतले त्यांचे काय? असे प्रश्न उपस्थित करण्यात येतील. आता ‘फुफा’ला कुरकुर करायला एक नवीन विषय मिळाला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रवाशांची आणि मालाची वाहतूक अधिक वेगाने करण्यासाठी, नवीन संधी निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही भारताची पायाभूत सुविधा बळकट करत आहोत. एका प्रमुख प्रकल्पाच्या शुभारंभ करताना एका कार्यक्रमाला संबोधित करताना, त्यांनी २०१४ पूर्वीच्या समर्पित मालवाहतूक मार्गाच्या स्थितीचा संदर्भ देत सांगितले की, आधीच्या सरकारच्या सात ते आठ वर्षांच्या कार्यकाळात या प्रकल्पाचा एक किलोमीटरचा भागही पूर्ण झाला नव्हता.

तरुण पिढी, म्हणजेच जेन-झीला, अत्यंत महत्त्वाच्या वाटणाऱ्या एका विषयावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या उद्देशाने, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित शिक्षकांकडून मोफत ऑनलाइन प्रशिक्षण देण्याच्या दिशेने सरकार वाटचाल करत आहे.

जग झपाट्याने बदलत आहे आणि त्यासोबतच जगाच्या गरजाही बदलत आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या शिकण्याच्या आणि शिक्षणाच्या पद्धती आणि मार्गही विकसित होत आहेत. पूर्वी संपूर्ण लक्ष केवळ पदवीवर केंद्रित असायचे, पण आता पदवीसोबतच कौशल्यांवरही लक्ष दिले जात आहे. कौशल्यांचे महत्त्व वाढत आहे. दरवर्षी मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कमाईचा एक मोठा हिस्सा या मुलांच्या शिकवणीवर खर्च होतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!