तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कोलकातातील कार्यालयाची तोडफोड; ६ जणांना अटक

Share

कोलकाताः शहरातील कॅमॅक स्ट्रीटवरील तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) समर्थक होते. पक्षाच्या नेत्यांनी प्रसारित केलेल्या चित्रफितींमध्ये तीन ते चार बुरखेधारी व्यक्ती कार्यालयातून काही उपकरणे काढताना दिसत आहेत. आजुबाजूला फुटलेल्या काचा आणि इतर साहित्य दिसत आहे. यावरून तोडफोड झाल्याचे स्पष्ट होते, असा त्यांचा दावा आहे.

पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांना हिंसाचार, तोडफोड आणि दहशतीच्या माध्यमातून अशी वागणूक दिली जाणार असेल, तर मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. ही लोकशाही नाही. ही राजकीय गुंडगिरी आहे, असे बॅनर्जी यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चित्रबध्द केलेले व्हीडिओ प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ही तोडफोड पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर, कोलकाता पोलिसांनी या घटनेप्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या उपासना चौधरी यांनी न्यायव्यवस्थेला, प्रामुख्याने कलकत्ता उच्च न्यायालयाला उद्देशून, जे काही घडत आहे त्याची गंभीर दखल घेऊन पश्चिम बंगालमध्ये कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी कारवाई करावी, असे आवाहन केले.

कोलकातामधील ९ कॅमॅक स्ट्रीट येथील जागेचा वापर अभिषेक बॅनर्जी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. २७ ऑगस्ट रोजी इमारतीवरील पक्षाचे होर्डिंग काढण्यावरून कर्मचारी, कोलकाता पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झटापट झाली होती.

या घटनेसंदर्भात पोलिसांनी एफआयआर नोंदवून तृणमूल नेत्यांची चौकशी केली आहे. या घटनेसंदर्भात कोलकाता पोलिसांनी अभिषेक बॅनर्जी आणि राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनाही बोलावले होते. पश्चिम बंगाल अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली आणि तेथे अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केला.

मे २०२६ मध्ये भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीसांवर १६ हून अधिक एफआयआर दाखल झाले आहेत. कलकत्ता उच्च न्यायालयाने त्यांना काही पोलिस प्रकरणांमध्ये अटकेपासून संरक्षण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Not permitted !!