मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय, भारतीय जनता पक्षाचे आमदार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला आहे. विधानसभा सदस्याने मागितलेल्या माहितीला अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे यांच्याकडून उत्तर देण्यास विलंब होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अविनाश ढाकणे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र कोटेचा यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना दिले आहे.
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०२ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्तांनी १६५ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. या बदल्यांमध्ये ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा प्रकार होत असल्याची लेखी तक्रार आमदार अमित साटम यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या आदेशाने संबंधित बदल्या रद्द करण्यात आल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे.
कोटेचा यांच्या म्हणण्यानुसार, १५ मे २०२६ रोजी त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र पाठवून जुन्या १६५ बदल्यांच्या प्रस्तावातील सुमारे ५० टक्के अभियंत्यांचा समावेश असलेला नवीन बदली प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले होते. हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) यांच्या मार्गदर्शनाखाली होत होते. आपल्या पत्राची दखल घेत आयुक्तांनी प्रस्तावित बदली यादी रद्द केली, असेही त्यांनी मुख्य सचिवांना कळविले आहे.
दोन-तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अभियंत्यांच्या बदल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा कोटेचा यांनी केला आहे. या अनियमिततेशी संबंधित ‘रेट कार्ड’सह संपूर्ण माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून ५ ऑगस्ट २०२६ रोजी अतिरिक्त महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे माहिती मागितली होती. पत्राला २६ दिवस उलटूनही उत्तर मिळाले नसल्याचे आमदार कोटेचा यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
प्रमुख प्रश्नांची माहिती आणि उत्तरे मिळाल्यास बदल्यांमध्ये पुन्हा ‘कॅश फॉर ट्रान्सफर’ झाले आहे का, याबाबत उपलब्ध माहितीच्या आधारे निष्कर्ष काढता येईल, असा दावा कोटेचा यांनी केला आहे. माहिती देण्यास होत असलेल्या विलंबामुळे अविनाश ढाकणे यांच्या भूमिकेबाबत आपला संशय अधिक तीव्र होत असल्याचेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.