मुंबई: पुणे जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले युवा डॉक्टर राजेंद्र जगन्नाथ रुपनवर (वय २७) यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या ओएसडीवर आरोप झाल्याने घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या मृत्यूवरून राज्यात वादळ उठलेले असताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सखोल कारवाईचे आदेश दिले आहेत.
रुग्णालयातील डॉक्टरांकडून डॉ. राजेंद्र रुपनवर यांना त्रास होत असल्याची त्यांची तक्रार होती. या प्रकरणात जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली होती. याप्रकरणात दोषींवर कठोर कारवाया केल्या जातील. पण जीव देणे हा निश्चितच पर्याय नाही. आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा, आपणावर अन्याय झाला तर संविधानिक मार्गाने लढायला हवे. कोणत्याही प्रश्नावर जीव देणे हा निश्चित उपाय नाही, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.

डॉ. राजेंद्र रूपनवर आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचे ओएसडी यांच्यात भांडण होते, त्यांनी दबाव टाकल्याचा उल्लेख चिठ्ठीमध्ये आढळून आला आहे, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांना विचारले असता, भारताच्या संविधानुसार आपली एखाद्याविरोधात तक्रार असेल तर पोलीस नोंद करून घेतात. पोलिसांनीही डॉ. राजेंद्र रूपनवर यांची रितसर तक्रार नोंदवून घेतली होती. पोलीस कारवाई करून योग्य-अयोग्य ठरवतील. कायदा सगळ्यांपेक्षा मोठा आहे, कायद्यापुढे सगळे समान आहेत, असे सांगून कारवाई करताना छोटा-मोठा पाहणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले.
डॉ. रूपनवर मृत्यू प्रकरणात कारवाया सुरू आहेत. त्यातील पहिला टप्पा फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे, दुसरा टप्पा म्हणजे आमच्या चौकशी समितीने जिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई केली आणि पोलीस तपासात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू, असे आरोग्यमंत्री आबिटकर यांनी आश्वस्त केले.
दरम्यान, राजेंद्र रुपनवर यांचे मूळ गाव फडतरी असले तरी अवघ्या एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. आईचे छत्र हरपल्यानंतर मांडवे येथील त्यांचे मामा दयाराम पाटील व नानासाहेब पाटील यांनी त्यांचा सांभाळ केला. स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवत मामांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि आईविना पोरक्या झालेल्या या लेकराला डॉक्टर बनविले. लहानपणापासूनच डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या राजेंद्र यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने शिक्षण पूर्ण केले. मांडवे येथील माध्यमिक शाळेतून दहावीचे शिक्षण घेताना त्यांनी 94 टक्के गुण मिळविले. त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये बारावी विज्ञान शाखेत 92 टक्के गुण मिळवत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
राजेंद्र हे दोन भावंडांपैकी एक होते. त्यांचे मोठे बंधू सागर हे आयसीआयसीआय बँकेत नोकरीस आहेत. मामांनी राजेंद्र यांच्या नावावर दोन एकर जमीनही करून दिली होती. दरम्यान, राजेंद्र यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, संबंधितांना निलंबित करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी त्यांच्या मामांसह नातेवाईकांनी केली आहे.