मुंबई महापालिकेत युतीमध्ये कुरघोडींचे राजकारण कायम…

Share

मुंबईः मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) युतीची सत्ता असली, तरी त्यांच्यात अंतर्गत कलह शमलेला नाही, असे दिसते. शिवसेनेकडे सुधार समिती असून, त्यांच्या कामकाजाबाबत भाजप नगरसेवकांच्या तक्रारीनंतर आता शिंदे सेनेनेही भाजपविरुद्ध तक्रार केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतिनीधींचे प्रस्ताव सभागृहात पूर्वसूचनेशिवाय न वाचताच भाजपकडून तहकूब केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या दोन्ही सत्ताधारी पक्षांत आलबेल असल्याचे चित्र दिसत नाही. या दोन्ही पक्षांत अंतर्गत कुरघोड्या चालूच असल्याचे समोर आले आहे.

सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी यांचे पती विपुल दोशी सुधार समितीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप भाजप नगरसॆवकांनी केला होता. मात्र, याबाबत भाजप नगरसेवकच विपुल दोशी यांचे मार्गदर्शन मागण्यासाठी येतात आणि ते समिती बैठकीत कुठेही हजर नसतात, असे स्पष्टीकरण संध्या दोशींनी दिले आहे. सोबतच, भाजपच्या सभागृह त्यांकडूनच पूर्वसूचनेशिवाय प्रस्ताव तहकूब करण्याच्या प्रकारावर संध्या दोशी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टाटा इन्स्टिटयूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट हा शासकीय कामकाजाशी निगडीत प्रस्ताव पूर्वसूचना न देता सभागृह नेते गणेश खणकर यांनी तहकूब केल्याबद्दल, गटनेता अमेय घोले आणि सभागृह नेता गणेश खणकर यांना संध्या दोशी यांनी पत्र दिले आहे. यावर सभागृह नेते गणेश खणकर यांच्याकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. महापौर, सभागृह नेते आणि गटनेते यांनी लक्ष घालावे आणि पुन्हा असे प्रकार घडल्यास आपल्या पदाचा, पक्षाचा अवमान समजून सभात्याग करणे योग्य ठरेल, असा इशारा सध्या दोशी यांनी पत्राद्वारे दिला आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची तब्बल २५ वर्षे सत्ता होती. यंदा भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटाची साथ मिळाली.त्यामुळे मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता स्थापन झाली आहे. मात्र, सत्ता स्थापन झाल्यापासून युतीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं चित्र आहे. कोणत्या ना कोणत्या विषयांवरुन दोन्ही पक्षांत कुरघोड्यांचे राजकारण चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांतील नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *