कर्नाटकात ‘वंदे मातरम्’ची पहिली दोनच कडवी म्हणणार – मुख्यमंत्री

Share

बंगळुरूः कर्नाटकात ‘वंदे मातरम’ची केवळ पहिली दोनच कडवी गाण्यात येतील. काँग्रेस पक्षाने यासंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे आपण पालन करू. पक्षाच्या भूमिकेवर आपण ठाम आहोत, असे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी येथे सांगितले.

पक्षाच्या विचारसरणीवर आपला ठाम विश्वास आहे. आम्ही जो निर्णय घेतला आहे, त्यावर आपण ठाम आहोत. आपल्या नकळत किंवा राजभवनात कदाचित पूर्ण वंदे मातरम् म्हणण्यात आले असेल, तथापि भविष्यात आणि कोणत्याही सरकारी कार्यक्रमांमध्ये आम्ही आमच्या आधीच्या निर्णयावरच, म्हणजेच दोन कडवी गाण्यावरच ठाम राहू, असे त्यांनी ‘इंडिया टुडे राउंड टेबल’मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या पूर्ण गायनाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

काँग्रेस कार्यकारी समितीने गेल्या आठवड्यात १९३७ मधील आपला ठराव पुन्हा एकदा अधोरेखित केला, ज्यानुसार सार्वजनिक आणि राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी गायली जावीत. ‘वंदे मातरम्’ विधेयकाद्वारे या राष्ट्रगीताची सर्व कडवी अनिवार्य करण्यात आली आहेत. त्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

भारतीय राजकारणातील ‘तुष्टीकरणाच्या राजकारणा’वर भाष्य करताना शिवकुमार म्हणाले, की काँग्रेसचा विविधतेवर विश्वास आहे आणि त्यांनी भाजपवरच तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.

भारत हा विविध समुदायांचा देश आहे. भाजप तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे, तर आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालण्यावर विश्वास ठेवतो. आमची विचारसरणी याच तत्त्वावर आधारित आहे, असे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या पहिल्या मुलाखतीत बोलताना शिवकुमार यांनी सांगितले.

भाजपने ‘वंदे मातरम’बाबत काँग्रेसच्या निर्णयावर टीका केली होती. पक्षाने राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आणि तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांचा देश आहे आणि प्रत्येकाचा आदर राखला गेला पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. आम्ही सर्वांचा आदर करतो. सूर्य, पाणी किंवा हवा यांना कोणताही धर्म नसतो. तुम्ही या गोष्टी बदलू शकत नाही; इतरांप्रमाणेच तुम्हालाही तीच हवा श्वासावाटे घ्यावी लागते आणि तेच पाणी प्यावे लागते. मग, हवा, पाणी, वनस्पती किंवा सूर्य यांना काही धर्म असतो का? असे शिवकुमार यांनी ‘हिंदू विरुद्ध हिंदुत्व’ या वादावर आपली भूमिका मांडताना सांगितले.

काँग्रेसचा असा युक्तिवाद आहे, की ‘वंदे मातरम्’च्या पुढील भागांमध्ये दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांसारख्या हिंदू देवींचे आवाहन केले जाते आणि त्यामुळे इतर समुदायांच्या लोकांना त्यावर आक्षेप असू शकतो, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *