राहुल गांधींना बदनाम करण्याचा भाजपचा डावः प्रणिती शिंदे यांचा आरोप

Share

पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहुल गांधींच्या कार्यक्रमापूर्वी झालेल्या राड्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावर थेट हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पक्ष हा नेहमीच विरोधी पक्षांच्या विरोधात नकारात्मक प्रचार करण्यात प्रसिद्ध असून, पुण्यात झालेला हा वाद म्हणजे राहुल गांधींचा नकारात्मक प्रचार करण्यासाठी रचलेले पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमांना बदनाम करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक कट रचला जात असल्याचा दावा खासदार त्यांनी केला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या मुद्द्याला राजकीय वळण देऊन भाजप केवळ नकारात्मक राजकारण करत असून, हा वाद म्हणजे पूर्वनियोजित कटकारस्थान असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना केला.

राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात काल मध्यरात्री काँग्रेस-एनएसयुआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादामुळे, पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवर प्रणिती शिंदे यांनी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या, की जेव्हा जेव्हा विरोधकांचे मोठे कार्यक्रम किंवा दौरे आयोजित केले जातात, तेव्हा त्यांचा मूळ उद्देश भरकटवण्यासाठी आणि लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणीवपूर्वक नकारात्मक वातावरण तयार केले जाते. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला धक्का लावणे, हाच यामागील मुख्य हेतू असल्याचा दावा त्यांनी केला.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, की राहुल गांधी हे देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक व इतर समस्या जाणून घेण्यासाठी पुण्यात आले आहेत. या दौऱ्याला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून सत्ताधाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या एका संवेदनशील आणि स्थानिक समस्येचे राजकीय भांडवल करून राहुल गांधींचा अपप्रचार करण्यासाठी हा संपूर्ण राडा घडवून आणण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाला आता दोन्ही बाजूंनी राजकीय रंग आला असून, पुणे पोलिसांनी मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर दोन्ही विद्यार्थी संघटनांच्या तक्रारी आणि उपलब्ध व्हीडिओ फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. पोलिसांनी ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले असून महाविद्यालयाच्या परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर राजकीय दबावापोटी अन्याय होऊ नये, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *